केपटाऊन । भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये डावखुरा स्पिनर केशव महाराजची निवड करण्यात आली आहे. केशव तिन वर्षांचा असताना भारताचे माजी विकेटकिपर यांनी हा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल असे भाकित वर्तवले होते. किरण मोरे यांची ही भविष्यवाणी आता खरी ठरली आहे. केशवचे वडिल आत्मानंद महाराजही क्रिकेटपटू होते. आफ्रिकेतल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आत्मानंद महाराज नाताळ ब कडून खेळले होते. आत्मानंद महाराज विकेट कीपर होते. रंगभेदांच्या कारणामुळे आत्मानंद महाराज यांना आफ्रिकेकडून खेळता आलं नाही. केशव महाराज लहान असतानाच भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांची भेट झाली होती. वर्णद्वेषाची भूमिका सोडल्यावर 1992 साली दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेट खेळण्यासाठी असलेली बंदी उठवण्यात आली.
यानंतर भारत हा आफ्रिका दौर्यावर जाणारा पहिलाच देश होता. यावेळी आत्मानंद महाराज यांनी प्रवीण आमरे, किरण मोरे, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांची भेट घेतली. किरण मोरे यांच्यासोबत झालेल्या दुसर्या भेटीमध्ये आत्मानंद यांनी किरण मोरेंना घरी बोलावले. आत्मानंद यांच्या विनंतीचा मान ठेवून किरण मोरेही महाराज यांच्या घरी गेले. याचवेळी किरण मोरे आणि केशव महाराज यांची भेट झाली. त्यावेळी केशव फक्त 3 वर्षांचा होता. आज केशवचे वय 27 वर्ष आहे. किरण मोरेबरोबर भेट झाल्यामुळेच केशव क्रिकेटपटू झाल्याची प्रतिक्रिया आत्मानंद महाराज यांनी दिली आहे. 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौर्यात केशवची दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये निवड झाली होती. त्यावेळी आत्मानंद यांनी 1992 साली काढलेला एक फोटो शेअर केला होता. झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच झालेल्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या दुसर्या डावामध्ये महाराजने 5 विकेट घेतल्या होत्या. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्येही महाराज खेळेल हे जवळपास निश्चित आहे.