चाळीसगाव – किर्तनासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोने, चांदीचे दागिने व ४० हजार रोकड असे २ लाख ३४ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चाळीसगाव शहरात घडली आहे. शहरातील जयशंकर नगरात हि घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील जयशंकर नगर येथील किर्तनकार रविंद्र वसंतराव पाटील (वय-४५) हे ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता घराला कुलूप लावून परिवारासह किर्तन करण्यासाठी धुळे येथे गेले होते. किर्तन आटोपल्यानंतर रविंद्र पाटील हे कुटुंबासह त्यांच्या साडूकडे दोन दिवस थांबले. दरम्यान पाटील हे रविवार, १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
त्यांनी घराची पाहणी केली असता घरातील बेडरूममधील कॉटमध्ये ठेवलेले सोने, चांदी व ४० हजार रुपये रोकड असे एकूण २,३४००० रूपये अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे दिसून आले. रविंद्र वसंतराव पाटील यांनी तात्काळ चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून फिर्याद दिली. यानुसार भादंवि कलम- ३८०, ४५४ व ४५७ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि आव्हाड हे करीत आहेत.