सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम
तळेगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात अनेक उत्तमोत्तम किल्ले उभे केले आहे. ते अभेद्य होते. मात्र तेव्हा अभेद्य असलेले अनेक किल्ले आता कोसळू लागले आहेत. अनेक किल्ल्यांवर दुर्गसंवर्धन मोहिमा राबवत असतानाच नुकताच सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील किल्ले तुंग व नंतर किल्ले तिकोना उर्फ वितंडगडला सागवानी दरवाजा बसवण्यात आला. या दरवाजाचा लोकार्पण सोहळा सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनी राजे दाभाडे सरकार व मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र आप्पा भेगडे यांच्या हस्ते झाला. या सोहळ्या प्रसंगी सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनी राजे दाभाडे सरकार, रवींद्र आप्पा भेगडे, महाराष्ट्र शासन गडकिल्ले समिती सदस्य श्रमिक गोजमगुंडे, नगरसेवक अमोल शेटे, विनीत भेगडे, पंचायत समिती सदस्य नितीन घोटकुले, बजरंग दलाचे पुणे जिल्हा संयोजक हिंदुश्री संदेश भेगडे, संपर्क प्रमुख अमित बच्छाव, हिंदुश्री कुणाल साठे, भास्कर खैरे, संगीता मोहळ, खैरे पोलीस पाटील, सुजित मोहळ आदी उपस्थित होते.
देवतांना अभिषेक आणि शस्त्रपुजन
रविवारी गडाच्या पायथ्याला ग्रामदेवतांचे उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात शिवघोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान गडावर झाले. रवींद्र भेगडे यांच्या हस्ते गडावरील वितंडेश्वराच्या मंदिरात अभिषेक करून शस्त्र पूजन करण्यात आले. बालेकिल्यावर शाहीर वैभव घरत व त्यांच्या सहकार्यांनी शाहिरी कला सादर केली तर डॉ. प्रमोद बोराडे यांनी तिकोना गडाच्या इतिहासाला उजाळा दिला. मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपणार्या वास्तूचे जतन होणे गरजेचे आहे. आपले गडकिल्ले शाबूत राहण्यासाठी सर्व स्तरातून मावळवासीयांनी प्रयत्न करावेत. स्थानिक युवकांनी गडकिल्ले सुरक्षित करण्याचे आवाहन रवींद्र भेगडे यांनी केले. तर सत्येंद्रराजे दाभाडे सरकार यांनी गडकिल्ले यांच्या संवर्धनासाठी झटणार्या शहातांचे व संस्थांचे कौतुक केले.
सागवानी दरवाजाची उभारणी
सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून व रवींद्र आप्पा भेगडे यांच्या पुढाकारातुन स्वराज्याच्या या सागवानी दरवाजाची उभारणी करण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष सदानंद पिलाणे यांच्या नेतृत्वाखाली व संदीप घोटकुले, अमित जाचक, सोन्याभाऊ ठाकर, सचिन शेडगे, गणेश रघुवीर, कुंदन भोसले, बाळा खाडभोर यांच्या अथक परिश्रमातुन तिकोणा मोहीम पार पडली. विश्व हिंदू परिषद मावळ, बजरंग दल, मावळ प्रबोधिनी, शिवदुर्ग दुर्गसंवर्धन संस्था आणि तिकोणापेठ ग्रामस्थ आदींचा सक्रिय सहभाग होता.