गड भटकंती संस्थेचा उपक्रम
तळेगाव : स्वराज्याची अस्मिता असणार्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या किल्ले तिकोनावर गड भटकंती दुर्गसंवर्धन संस्था आणि श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्यावतीने विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली. दसर्यानिमित्त घरातील शस्त्र, वाहन, यंत्र, पुस्तके, यांचे पूजन करून संस्थेच्या सभासदांनी किल्ले तिकोनागड येथे कूच केले. गड पूजनाकरिता पोलीस नाईक संदीप ओझरकर यांनी सुमारे 20 किलो फुले उत्सवाकरिता पिंपरी येथून पाठवुन दिली होती.
आदल्या दिवशी रात्री उशीरापर्यंत गडावर अक्षय, मनोज, गुरूदास, सोनु यांनी फुलांच्या माळा तयार केल्या होत्या. सकाळी 11 वाजता सर्वजण गडाच्या देवडी येथे जमले. रांगोळी, फुलहारांचे तोरण, यांची सजावट झाली प्रथम गडाच्या दरवाजाची पूजा करून गड पुजनास सुरवात झाली. त्यानंतर वेताळ महादरवाजा, वेताळ मंदिर, चपेटदान मारूतीराय, रोप-वे, छोटा दरवाजा, महादरवाजा, वितंडेश्वर मंदिर अशा सर्व वास्तू फुलांनी सजवत रांगोळ्या काढत पूजन केले. त्यानंतर ध्वजास हार अर्पण करून वंदन करण्यात आले. शेवटी सर्वजण तळजाई माता लोणी येथे पोहचले. या ठिकाणी अवजारे स्वच्छ करून ठेवली होती. संतोष गोलांडे यांच्या हस्ते अवजारांची पूजा करण्यात आली. त्यानंतर एकमेकांना सोने देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माऊली मोहोळ, गुरूदास मोहोळ, सेनु मोहोळ, किरण चिमटे, अक्षय औताडे, संतोष गोलांडे, संपत लोखंडे आदी उपस्थित होते.