किल्ल्यांवर सफाई व वृक्षारोपणाचा संकल्प

0

हडपसर:  मल्हारगड आणि पुरंदर या दोन किल्ल्यांवर साफसफाई करून वृक्षारोपण केले. हे दोन किल्ले वृक्षारोपणासाठी दत्तक घेण्याचा निश्‍चयही करण्यात आला आहे. यानिमित्ताने ‘झेड प्लस गड संवर्धन’ समितीची स्थापना करण्यात आली आहे. ज्यामध्ये 50 सभासद असून दरवर्षी काही किल्ले स्वच्छता आणि वृक्षारोपणासाठी दत्तक घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

900 सीड बॉल्स बनवले
या उपक्रमाची संकल्पना डॉ.राहुल झांजुरणे यांची असून त्यांनी याद्वारे शिवबा या आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस किल्ल्यावर साजरा केला. यानिमित्ताने गेले साताठ दिवस समितीने 900 सीड बॉल्स बनवले होते. किल्ल्यांच्या परिसरात वाढतील अशी जंगली, फळझाडे निवडून त्यांच्या 2000 बिया वापरल्या. रिठा, शिकेकाई, सागरगोटा, बेहडा, खैर, रामकाठी, हिरडा, काटेबाभूळ, बोर, चिंच, करंज, आपटा, इलायती चिंच, सिसम, गुलमोहर, सुबाभूळ, शमी, सागवान आणि कडुलिंब या झाडांच्या प्रत्येक सीड बॉलमध्ये दोन-तीन बिया भरून शेण आणि मातीचे गोळे बनवले.

माहितीफलक बसविणार
सोमवारी भल्या पहाटे समितीचे सदस्य बसने मल्हारगडच्या पायथ्याला पोहोचले तेथे त्यांनी किल्ल्याच्या सगळ्या बाजूला मिळून 500 सीडबॉल वापरले. त्यानंतर पुरंदर किल्ल्याच्या घाटात सगळ्यांनी चालत रस्त्याच्या दोन्ही बाजूस मिळून 400 बॉल टाकले. पुढच्या वर्षी याबरोबरच गडांवर सोलर दिवे आणि माहितीफलक बसवण्याचे नियोजन केले आहे.

सरकारच्या मदतीची गरज नाही
याकामासाठी केवळ 300 समविचारी लोक एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या प्रियजनांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या-त्या भागातील गडस्वच्छता करून वृक्षारोपण केल्यास दरवर्षी तेवढे किल्ले साफसूफ होतील. सरकारच्या मदतीवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. अशा इच्छुकमंडळींना समितीतर्फे 500 बिया मोफत उपलब्ध करून देण्यात येतील तसेच इतर तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात येईल. या कार्यासाठी सगळ्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाची समितीला नितांत गरज आहे.
डॉ.राहुल झांजुरणे