पिस्तुल लॉक झाल्याने सुदैवाने बचावला
पिंपरी-चिंचवड : किवळे येथील उत्तमनगर येथे लेखा फार्मच्या मागे फार्महाउसवर मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकावर दोघा अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. मात्र सुदैवाने गोळी झाडताना पिस्तुल लॉक झाले व गोळ्या पिस्तुलमधून पुढे न जाता जागेवर खाली पडल्या. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दादा उर्फ गोरख तरस (वय 42) असे हल्ला झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करत हल्लेखोरांचा शोध सुरु केला होता.
हे देखील वाचा
जीवघेणा हल्ला सीसीटीव्हीत!
देहूरोड उत्तमनगर येथील फार्म हाऊसवर दादा उर्फ गोरख तरस आपल्या चार मित्रांसोबत सकाळी साडेअकराच्या सुमारास गप्पा मारत बसले होते. अचानक एका चारचाकी वाहनातून आलेल्या दोघांनी फार्महाऊसमध्ये प्रवेश केला. तोंडाला कापड बांधलेल्या दोघांनी जवळून तरस यांच्यावर गोळीबार केला. मात्र सुदैवाने पिस्तुल लॉक झाल्याने गोळी सुटू शकली नाही. दरम्यान, हल्लेखोरांपासून जीव वाचविण्यासाठी तरस यांनी भिंतीवरून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला. तर अन्य चार मित्रांनी आरडाओरडा केला. आरडाओरड व गोंधळ वाढू लागल्याने दोघा हल्लेखोरांनी तिथून धूम ठोकली. फार्महाऊस व परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला असून, देहूरोड पोलिस त्याआधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.