किवळे तोडफोड प्रकरणातील संशयित अटकेत

0

दोन महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

देहूरोड : किवळे, आदर्शनगर आणि शितळानगर भागात तोडफोड करून एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणातील संशयित आरोपीस देहूरोड पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. मात्र, पोलिसांनी अखेरीस त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अरूण मुकेश हस्तोडिया (वय 27, रा. कृष्णवंता हौसिंग सोसायटी, दत्तनगर, किवळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दोन महिन्यांपूर्वी धुडगूस
दोन महिन्यांपूर्वी (2 जुलै) दत्तनगर, एम. बी. कॅम्प आणि मुकाई चौकात सशस्त्र टोळक्याने धुडगूस घालत सुमारे बारा हातगाड्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर या टोळक्याने शितळानगर येथील गुड्ड्या उर्फ नीतेश दिलीप गोसावी याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. त्याला अर्धमेल्या अवस्थेत दुचाकीवरून काहीजण घेऊन जात होते. मात्र, शिंदे पंपाजवळ रात्रगस्तीवरील पोलीस व्हॅनला पाहून हल्लेखोरांनी त्याला रस्त्यावर टाकून पलायन केले होते. या प्रकरणात मुख्य सूत्रधार अरूण हस्तोडिया असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते.

पिंपरीत पकडले
वर्चस्व वादातून दोन टोळ्यांमध्ये अधून-मधून वाद उफाळून येतात. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे समोर आले होते. या दोन टोळ्यांच्या वादाचे परिणाम सामान्य नागरिकांना भोगावे लागल्यामुळे वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणात लक्ष घालण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी पिंपरी येथे न्यायालयात हस्तोडिया येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक अनिल पवार व त्यांच्या पथकाने न्यायालयाबाहेर सापळा रचून त्याला पकडले. त्याला वडगाव मावळ येथे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.