पुणे । ‘आने वाला पल…वो तो कोई और थी, जो आखो मे समा गयी… कोरा कागज था, ये मन मेरा… चिंगारी कोई भडके…’ यांसारख्या एकाहून एक सरस आणि वेगळा बाज असलेल्या किशोर कुमार यांच्या गीतांनी संगीताचे सुरेल पर्व रंगमंचावर अवतरले. ‘अगर तुम ना होते…’ असे म्हणत किशोरदा नसते, ही सूरांची जादू करोडो रसिकांना अनुभवायला मिळाली नसते, असे सांगत त्यांच्या गाण्यांचा निराळा अंदाज रसिकांसमोर कलाकारांनी सूर आणि संगीताच्या माध्यमातून पेश केला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त ‘गीत गाता हू मै…’ हा जितेंद्र भुरुक आणि सहकार्यांचा विशेष कार्यक्रम झाला. ऑल इन वन असलेल्या किशोरदांनी अनेक वर्षे चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यांच्या गायकीसोबतच अभिनय व मिश्किलतेच्या आठवणी ऐकताना रसिक रमले होते. ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू…’ या एस.डी. बर्मन यांचे संगीत असलेल्या गीताच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी उर्त्फूत दाद दिली. तर, ‘गीत गाता हू मै…ओ मेरी हन्सिनी… तुम आ गये हो…’ अशा गीतांच्या सादरीकरणासोबतच चित्रपटातील त्या गाण्यांच्या चित्रफिती पाहताना रसिकांना चित्रपटांच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली.
देवानंद, राजेश खन्ना, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन अशा सुपरस्टार अभिनेत्यांकरिता किशोरदांनी केलेले गायन ऐकण्याचा स्वरानुभव पुणेकरांनी कार्यक्रमातून घेतला. जितेंद्र भुरुक आणि सहकार्यांनी सादर केलेल्या ‘शोले’ चित्रपटातील ‘कोई हसिना जब रुठ जाती है तो…’ ‘प्रेम पुजारी’ चित्रपटातील ‘शोखियों मे घोला जाये…’ ‘याराना’ चित्रपटातील ‘सारा जमाना हसिनों का दिवाना…एक लडकी भिगी भागीसी… अबके सावन में जी करे… रिमझीम गीरे सावन…’ या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. तर गंमतजंमत चित्रपटातील ‘अश्विनी ये ना…’ या गीताला रसिकांनी टाळ्या आणि शिट्टयांतून दाद दिली. महेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.