पोलिसांच्या तपासावर जिल्हा न्यायालयाने ओढले ताशेरे ; इतर दहा संशयितांची निर्दोष मुक्तता ;
जळगाव : चौघुले प्लॉट भागातील किशोर मोतीलाल चौधरी (32) याच्या खून खटल्यात जिल्हा न्यायालयाने आरोपी सुरेश सुरेश दत्तात्रय सोनवणे वय 44 यास खुनाच्या कलमाखाली दोषी धरत सश्रम जन्मठेप, पाच हजार रुपये दंड तर सुरेशची पत्नी रत्नाबाई सुरेश सोनवणे वय 39, उमेश धनराज कांडेलकर व वैशाली उमेश कांडेलकर वय 29 सर्व रा. प्रजापत नगर यांना 324 कलमाखाली दोन वर्ष सश्रम कारावास, अडीच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तर गुन्ह्यातील 10 संयशितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जिल्हा न्यायालयाचे प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश गोविेंद सानप यांनी हा निकाल दिला. या खटल्यात पोलिसांच्या तपासातील उणीवा, त्रुटीबद्दल चांगलेच ताशेरे ओढले. दरम्यान शिक्षा सुनावल्यावर सुरेश सोनवणे यास रडू कोसळले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय आवारात पोलिसांचा वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
काय घडली होती घटना
या खटल्याची माहिती अशी की, गणेश विश्वास सपकाळे याच्याविरुध्द दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात सागर मोतीलाल चौधरी फिर्यादी आहे. या गुन्ह्यात 10 मार्च 2016 रोजी सागर चौधरी याने गणेश सपकाळे याला मदत करावी, कोर्टात विरोधात साक्ष दिली आहे असे म्हणत सुरेश दत्तात्रय सोनवणे, उमेश धनराज कांडेलकर या दोघांनी बर्फ फोडण्याच्या टोच्याने व इतरांनी किशोर चौधरी याच्यावर हल्ला केला होता तर भांडण सोडविण्यासाठी आलेले मोतीलाल भावलाल चौधरी, योगीता किशोर चौधरी, जयश्री सागर चौधरी, सुभद्राबाई मोतीलाल चौधरी व नीलेश पंडीत चौधरी यांना इतर 10 ते 15 जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. दरम्यान, उपचार सुरु असताना त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी किशोर चौधरी याचा मृत्यू झाला होता.
गुन्हा घडल्यापासून होते 12 जण कारागृहात
याप्रकरणी मयत किशोरचे वडील मोतीलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन सुरेश दत्तात्रय सोनवणे, उमेश धनराज कांडेलक, रत्नाबाई सुरेश सानेवणे, वैशाली उमेश कांडेलकर, रंजनाबाई भगवान कोळी, योगीता गणेश सपकाळे, सखुबाई विश्वास सपकाळे, सागर जगन्नाथ सपकाळे, ज्ञानेश्वर भीवसन ताडे उर्फ नाना मराठे, गणेश विश्वास सपकाळे (कोळी),अंजना किशोर कोळी, भगवान बाबुराव कोळी व किशोर अनिल कोळी यांच्याविरुध्द शनी पेठ पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्याच्या दुसर्या दिवशी संशयित रत्नाबाई, वैशाली, रंजनाबाई, योगिता सखुबाई, ज्ञानेश्वर ताडे यांना अटक झाली होती. तर 12 मार्च रोजी अंजना कोळी, सागर सपकाळे तसेच सुरेश सोनवणे तसेच उमेश कांडेलकर यांना 13 मार्च 2016 रोजी अटक झाली होती. 7 सप्टेंबर 2016 रोजी पंकज वासुदेव पाटील यास अटक करण्यात आली होती. दरम्यान, गणेश सपकाळे वगळता इतर 12 जण घटना घडल्यापासून कारागृहात आहेत.
गुन्ह्यातील दहा संशयितांची निर्दोष मुक्तता
तपासाधिकारी तत्कालिन पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व प्रमुख सत्र न्या. गोविंद सानप यांच्या न्यायालयात हा खटला चालला. या सरकारपक्षातर्फे फिर्यादी मोतीलाल चौधरी, यांच्या डॉ. प्रशांत बोरले, डॉ. शेख आसिफ इकबाल, तपासधिकारी अशा एकूण 14 जणांची साक्षी नोंदिवण्यात आली. पुरावे ग्राह्य धरत न्या. सानप यांनी सुरेश सोनवणे यास 302 कलमखाली सश्रम जन्मठेप, 5 हजार रुपये दंड , दंड न भरल्यास 6 महिने साधा कारवास तर 324 या कलमखाली उमेश कांडेलकर, रत्नाबाई सोनवणे, वैशाली उमेश कांडेलकर या तिघांना 2 वर्ष सश्रम कारावास व अडीच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. दरम्यान या गुन्ह्यातील रंजना कोळी, योगीता सपकाळे, सखुबाई सपकाळे, सागर सपकाळे, ज्ञानेश्वर ताडे उर्फ नाना मराठे पंकज वासुदेव पाटील वय 37, गणेश सपकाळे, अंजना कोळी, भगवान कोळी, किशोर कोळी या दहा संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
शिक्षा 24 महिन्याची ; कारागृहात राहिले 44 महिने
यात उमेश, रत्नाबाई व वैशाली यांना 22 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. प्रत्यक्षात ते 44 महिने कारागृहात होते. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके तर बचाव पक्षातर्फे अॅड.प्रकाश पाटील, अॅड.अकील इस्माईल, अॅड.सूरज जहांगीर, अॅड.पंकज पाटील व अॅड.गणेश सोनवणे यांनी बाजू मांडली. तर खटल्यात केसवॉच शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रशांत देशमुख, भगवान आरखे तसेच पैरवी अधिकारी म्हणून राजेंद्र सैंदाणे यांनी सहकार्य केले.
न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ओढले ताशेरे
न्यायालयाने निकाल देताना पोलिसांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. तपास करताना पोलिसांनी हा प्रकरणात जाणवीपूर्वक उणिवा व त्रुटी ठेवल्या. फोटो घेताना व सादर करताना पुरेशी काळजी घेतली नाही. जप्ती पंचनामा देखील गांभीर्याने केलेला नाही. मेडीकल मेमोत पुरेशी माहिती व वेळ दिलेली नाही. असे असले तरी या खटल्यात न्यायालयाने सीसीटीव्हीचा बारकाईने अभ्यास केला. त्यात प्रत्यक्ष घटनास्थळी चार जण दिसून येत आहेत. मुख्य आरोपी सुरेश सोनवणे याच्याजवळ बर्फ फोडण्याचा टोचा दिसत नसला तरी तो कमरेत किंवा खिशात ठेवला असू शकतो. त्याशिवाय न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेने (सी.ए.) दिलेल्या अहवालात जप्त केलेल्या टोचाला मानवी रक्त लागलेले असल्याचे म्हटले आहे. सरकारपक्षाने समोर आलेल्या पुराव्यावर भर दिला. त्यानुसार न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली.
कैलास सोनवणे यास दाखविले होते फरार
कैलास नारायण सोनवणे यांचे दोषारोपपत्रात आरोपी म्हणून नाव नाही. मात्र त्याच्या विरोधात पुरावा नसल्याने त्याच्यावर दोषारोप ठेवण्यात आले नव्हते. गुन्हा घडल्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली. मात्र गुन्हा घडल्यापासून ते आजपावेतो कैलास सोनवणे यांना फरार दाखविण्यात आले होते. त्यांना अटक न्यायालयात हजर करणे गरजेचे होते. त्यांना अटक झाल्यास पुन्हा हा खटला चालू शकतो, मात्र पोलिसांनी त्यांना सुरुवातीपासूनच फरार दाखविले, असे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सांगितले. तसेच निकालावर समाधानी नसून निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.