ठाणे । किसननगर भागातील धोकादायकच्या यादीत असलेल्या विजय निवास या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील स्लॅब दुसर्या मजल्यावर पडून झालेल्या दुर्घटनेत एका 60 वर्षीय वृध्दाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेत तीन महिला देखील जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु, या घटनेमुळे किसनगर भागातील इमारती पुन्हा रडावर आल्या आहेत. या घटनेनंतर बिल्डिंगला सील करण्यात आले आहे.
जखमींवर उपचार सुरू
शुक्रवारी रात्री 12.30 च्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन विभागाला यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांचे व अग्निशमन दलाचे पथक, 2 अॅम्ब्युलन्स, घटनास्थळी दाखल झाल्या. तळ अधिक पाच मजल्याच्या या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील हॉल मधला स्लॅब हा दुसर्या मजल्यावर पडल्याचे पालिकेच्या अधिकार्यानी सांगितले आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेत दुसर्या मजल्यावरील बबलू घोष (60) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बानी बबलू घोष (56) या देखील जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. त्यामुळे त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर नयना पाठारे (59) यांच्यासह यास्मीन रजनीकांत पठारे (22) या देखील किरकोळ जख्मी झाल्या आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इमारतीचा सर्व्हे सुरू
ही इमारत 20 वर्षे जुनी असून ती धोकादायक इमारतींच्या यादीत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या इमारतीमध्ये 38 कुटुंबांचे वास्तव्य असून घटना घडल्यानंतर काहींनी बाजूच्या इमारतीचा आसरा घेतला आहे. तर पालिकेनेदेखील येथील रहिवाशांना हलविले आहे. या इमारतीत ओव्हरलोड झाल्यानेच हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. त्यानुसार ही इमारत वापरण्यास योग्य आहे अथवा नाही, याची माहिती घेण्यासाठी पालिकेची स्ट्रक्चरल ऑडीटची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांच्याकडून या इमारतीचा सर्व्हे सुरु झाला आहे. या ऑडीटचा अहवाल दोन दिवसात पालिकेला प्राप्त होणार असून त्यानंतर या इमारतीचे भवितव्य ठरविले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, या दुर्देवी घटनेनंतर किसनगर हा परिसर पुन्हा एकदा रडारवर आला आहे.