आज दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या गेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसाठी कांदा विस्कटत आंदोलन केल्याने आज अख्खा विरोधी पक्ष जागा झाला. आज तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रशांत परिचारक यांचे निलंबन हे दोन मुद्दे जोरदार वाजले आणि दोन्ही मुद्दयावर चर्चा न होता दोन्ही सभागृह दुपारी 12 वाजताच बंद झाली.
पहिले दोन दिवस शेतकरी विस्मृतीत गेल्याने तिसऱ्या दिवशी मात्र सर्वपक्षीय विरोधक सकाळपासून बळीराजासाठी एकवटले. सभागृहाबाहेर आणि सभागृहात विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी आवाज बुलंद केला. प्रचंड गोंधळानंतर विधानसभाअध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. या मागणीसाठी सत्तेत असलेल्या शिवसेना देखील आक्रमक झाल्याने सरकार चांगलेच कोंडीत सापडले आहे. शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे हे अर्थातच सत्ताधारी आणि पुढाऱ्यांना सांगायची गरज नाहीच. राज्यातील लाखो शेतकरी अगदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर अनेक शेतकरी बोगस धोरणांमुळे अडचणीत आहेत. आताचे विरोधक म्हणजे आघाडी सरकार जेंव्हा सत्तेत होते तेंव्हादेखील अवस्था काहीअंशी अशीच होती. आताचे सत्ताधारी त्यावेळी जीव तोडून शेतकऱ्यांसाठी ओरडत होते. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आताचे मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेब आणि अनेक महत्वाचे मंत्री रस्त्यावर उतरून आणि सभागृहात मोठ्याने ओरडून शेतकऱ्यांसाठी न्याय व हक्काची मागणी करत होते. आता ते सत्तेत आले आणि परिस्थिती बदलली. पण ही परिस्थिती फक्त ह्या नेत्यांचीच बदलली. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर मोठमोठ्याने आंदोलन करणारे सदाभाऊ कालच्या आंदोलनात गायब होते. शेतकरी आणि सामान्यांचा नेता म्हणून ओळखले जाणारे महादेव जानकर चिडीचूप आहेत. म्हणजे लाल दिव्याची चटक आंदोलक कार्यकर्ता देखील संपुष्टात आणते याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.
आज शेतकऱ्यांसाठी सरकारला ‘दळभद्री’ म्हणणारे ‘दादा’ पाणी नाही तर धरणाकडे गेले होते. आज ते शेतकऱ्यांसाठी लढताहेत हे पाहून शेतकरी धरण विसरून जाईल? असाही भाबडा सवाल उपस्थित होतोय. तर विखे-पाटील साहेबांवर आज त्यांच्या भावानेच आरोप लावल्याने त्यांच्यात विरोधाची धार कुठेतरी कमी जाणवत होती. ती धार अशीही धनंजय मुंडे किंवा गेल्या सरकारातले विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांच्यासारखी कधी होईल हे तेच जाणो. बाकी नाथाभाऊंच्या अडचणीत वाढ झाल्याचे गॉसिपिंग आज सभागृह लवकर बंद पडल्याने जागोजागी चालू होते. शेतकऱ्यांना मोबाईल रिचार्ज करायला पैसे आहेत मग बिल भरायला काय होतंय! असं बोलून नाथाभाऊंनी देखील शेतकऱ्यांना दुखावले होतेच. आज शेतकऱ्यांसाठी विरोधक बोलत असताना नाथाभाऊंच्या अर्थातच आठवण झालीच. बाकी भाजपा सरकारची शिवसेना गोची करतेय की संधिसाधूपणा करतेय? हे सामान्यांना कळायला भाग नाही. परवा महापौरपदाची सेटिंग झाल्यावर शिवसेना गप्प बसते की काय असे वाटत होतं, मात्र असं झालं नाही. सेनेचा भाजपाशी ‘सामना’सुरूच आहे. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रशांत पारिचारक यांचे निलंबन या दोन मुद्यावरून दोन्ही सभागृह बंद पडली. दोन्ही मुद्यावर शिवसेना विरोधकांच्या भूमिकेत दिसून आली. याच दोन ‘जय जवान-जय किसान’च्या नाऱ्याला सेना जागली असं राहून राहून वाटतंय. मात्र अशामुळे सेनेच्या मंत्री असलेल्या नेत्यांच्या मनात काय चालत असेल? असा प्रश्नही मनात येऊन जातो आहे