अमळनेर । किसान कार्ड घेण्यासाठी तालुक्यातील रडावन येथील 70 वर्षीय लखवा झालेल्या वृद्धाला लघुशंकेच्या नळीसह दोन तास वाट बघावी लागल्याने जिल्हा बँकेच्या अमळनेर शाखेत माणुसकीच हरविल्याचा अनुभव 7 जून रोजी दुपारी नागरिकांना आला. रडावन येथील भोमा सुकलाल पाटील यांना गेल्या 2 महिन्यापासून लखवा झाल्याने त्यांचा एक हात व एक पाय पूर्ण निकामी झाला आहे. त्यांच्यावर आजही उपचार सुरू असून लघुशंखेसाठी नळी लावली आहे. विकासोचे कर्ज काढण्यासाठी ते बुधवार 7 जून रोजी बाजार समितीत असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेत रिक्षा करून आले. त्यांच्यासोबत पत्नी मंजुळा बाई, मुलगा अशोक, नातू संदीप सोबत आले होते.
रांगेत उभे न राहता आल्याने रिक्षाचा घेतला आधार
रुग्ण असल्याने त्यांचा अंगठा बँक कर्मचार्यांनी बाहेर येऊन घ्यावा, अशी विनंती नातू संदीपने शाखा व्यवस्थापक दीपक सूर्यवंशी यांच्याकडे केली. मात्र त्यांनी लखवा झालेल्या रुग्णास रांगेत येण्यास सांगितले. परंतु त्याना बसताही व्यवस्थित येत नसल्याने उभे कसे राहणार शेवटी नाईलाजाने रुग्णाच्या पत्नी मंजुळबाई रांगेत उभ्या राहिल्या. भोमा पाटील यांना बसता येत नसल्याने कुटुंबियांनी त्यांना रिक्षात धरून ठेवले होत. जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या माणुसकी शून्य वर्तनाची माहिती सरपंच वसंत पाटील यांनी संचालक अनिल भाईदास पाटील यांना दिली. मात्र तोपर्यंत 2 तास उलटले होते. पत्नी मंजुळबाईचा नंबर लागला आणि त्यानंतर बँकेच्या कर्मचार्यांनी कागदपत्रांवर अंगठा घेऊन किसान कार्ड दिले. ही घटना पाहून अनेकांचे मन हेलावले, मात्र बँक कर्मचार्यांची माणुसकी हरविल्याचा संताप ही व्यक्त केला गेला.
कर्मचारी कमी असल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर केली आहे. मात्र तरीदेखील कर्मचारी वाढवून दिले नाहीत. शासनाचे किसान कार्ड शिवाय कर्ज देऊ नये हे धोरण शेतकर्यांना मारक ठरत आहे. मात्र कर्मचार्यांना दया येऊ नये याची खंत वाटते. बँक संचालक म्हणून स्वत:ची लाज वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हा बँकेच्या बैठकीत आवाज उठवला जाईल.
– अनिल भाईदास पाटील, संचालक, जिल्हा बँक.
बँकेत सर्व वृद्धांच्या रांग लागली आहे. सकाळी च काउंटरवर ग्राहकांनी काच फोडली, त्यामुळे आमचा नाईलाज होता. लोक आम्हाला शिव्या देतात. आधीच कर्मचारी कमी असल्याने आम्हालाही खूप त्रास होत आहे
– दीपक सूर्यवंशी, व्यवस्थापक