किसान कृषिप्रदर्शनात दोन चोरीच्या घटना

0
मोशी : कृषिप्रदर्शनामध्ये चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. एका दुधाच्या स्टॉलवरून 75 हजार रुपये असलेली बॅग आणि एका वृद्ध महिलेची 59 हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी चोरून नेली. या दोन्ही घटना रविवारी उघडकीस आल्या आहेत. तन्मय विजयराव थोरात (वय 21, रा. अहमदनगर) आणि उषा दीपक वंजारे (वय 62, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थोरात आणि वंजारे यांचे मोशी येथील कृषिप्रदर्शनात दोन वेगवेगळे स्टॉल आहेत. फिर्यादी थोरात हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असून ते बारामती येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत आहेत. थोरात आणि त्यांचे मित्र निलेश जरांडे, विशाल बनसोडे, ओंकार पन्हाळे यांनी एकत्रित येऊन कुल्फी आणि फ्लेवर मिल्कचा स्टॉल लावला होता. 12 ते 16 डिसेंबर या पाच दिवसांमध्ये धंद्यातून मिळालेले पैसे त्यांनी एका बॅगमध्ये काऊंटरच्या खाली ठेवले. चोरटयांनी थोरात यांची नजर चुकवून पैशाची बॅग चोरून नेली. दुसर्‍या घटनेत फिर्यादी वंजारे यांनी लघुउद्योग पॅव्हेलियनमध्ये वॉशिंग मशिनरी हा स्टॉल लावला होता. त्यांनी दोन तोळ्याचे मंगळसूत्र, मोबाईल, घड्याळ आणि रोख 10 हजार असा एकूण 58 हजार 600 रुपयांचा ऐवज असलेली पर्स काऊंटर जवळ ठेवली होती. चोरटयांनी ती पर्स चोरून नेली. रविवारी कृषीप्रदर्शनाचा शेवटचा दिवस तसेच सुटीचा वार असल्याने प्रत्येक स्टॉलवर ग्राहकांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत चोरटयांनी स्टॉल धारकांना टार्गेट केले. यावरून गुन्हे दाखल करण्यात आले असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.