किसान क्रांती मोर्चातर्फे होणार ठिय्या

0

चाळीसगाव । शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी 1 जून पासून संप पुकारला आहे. या संपाचा दुसरा टप्पा म्हणून नाशिक येथील शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने 12 व 13 जून रोजी आंदोलन करणार असल्याचे ठरले असून त्याला पाठिंबा म्हणून चाळीसगाव येथील रयत सेना, सह्याद्री प्रतिष्ठान, संभाजी सेना व किसान क्रांती मोर्चाच्या वतीने 12 व 13 रोजी चाळीसगाव येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे येथे शासकीय विश्राम गृहात झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले आहे.

13 रोजी होणार रेल रोको आंदोलन
किसान क्रांती मोर्चाचे विवेक रणदिवे रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे, किसान क्रांती मोर्चाचे विवेक रणदिवे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मुकेश गोसावी, पीपल्स सोशल फाउंडेशनचे आकाश पोळ यांच्या प्रमुख उपस्थित शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकर्‍यांच्या संपातील दुसर्‍या टप्प्याच्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यात अली असून नाशिक येथे शेतकरी सुकाणू समितीच्या ठरलेल्या आंदोलनासंदर्भात 12 जून 2017 रोजी शेतकर्‍यांसह तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून 13 जून रोजी रेल रोको व रास्ता रोको करण्याचे ठरवण्यात आले आहे. या बैठकीस किसान क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, रयत सेना, संभाजी सेना, सह्याद्री प्रतिष्ठान, भ्रष्टाचार निर्मूलन समिती व पीपल्स सोशल फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात पक्ष सामाजिक संघटना, शेतकरी संघटना व शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.