जळगाव । पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्रशासनाकडून आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. दोन हेक्टर पर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र असलेल्या शेतकऱ्यास वार्षिक सहा हजार रूपये अनुदान म्हणून थेट खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १५०२ गावे असून यातील १३३८ गावांतील शेतकऱ्याची माहिती संकलित करण्यात आली आहे. योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण ३५ हजार ३३५ शेतकऱ्यांची माहिती मिळविण्यास जिल्हा प्रशासनास यश आले आहे. किसान सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याच्या नावाच्या याद्या लवकरात लवकर संकलित करण्याचा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी संबंधित महसूल विभागाला दिले आहे.