किसान सन्मान योजनेपासून 1 हजार 37 लाभार्थी वंचित

0

आवश्यक दुरुस्ती करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नवापूर:पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत तालुक्यातील 21 हजार 630 शेतकरी लाभार्थी आहेत. त्यापैकी 1037 लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. या शेतकर्‍यांनी आपल्या बँकेत जाऊन आवश्यक दुरुस्ती करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका काँग्रेस कमेटीतर्फे करण्यात आले आहे.

नवापूर तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत तालुक्यातील 20 हजार 593 शेतकरी लाभार्थी आहेत. तर एक हजार 37 लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. या शेतकर्‍यांच्या त्यांच्या बँकेतील नाव व आधार कार्ड या नावात काही तांत्रिक चुका आहेत, किंवा एकाच नावाची दोन खाती असल्यामुळे या लोकांना या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे.लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँकेच्या खात्यात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये शासनामार्फत जमा होतात. वंचित लाभार्थ्यांनी आपल्या आधार कार्डनुसार बँकेच्या खात्यात नावात दुरुस्ती करून घ्यावी. जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी काही अडचण आल्यास नवापूर काँग्रेस कमिटीमध्ये तानाजीराव वळवी व जालमसिंग गावित यांच्याशी संपर्क साधावा. तालुक्यातील एक हजार 37 लोकांची गावनिहाय यादी जालमसिंग गावित व तानाजीराव वळवी यांच्याकडे आहे. यादी संबंधित गावातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहेत. आपली नावे जर यादीत असतील तर आवश्यक कागदपत्रे घेऊन बँकेत जाऊन दुरुस्ती करावी.

उद्या पीक कर्ज मेळावा
तालुक्यातील पिक कर्ज वाटप मेळावा 22 जूनला आयोजित केला आहे. तालुक्यातील वडकळंबी, करंजवेल, गंगापूर, भादवड, वडफळी, जामदा, उमराण, आमपाडा, रायांगण, चितवी, चिंचपाडा, रायपूर या 14 गावांना पीक कर्ज वाटप मेळावा आयोजित केला आहे. स्टेट बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ बडोदा या विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेत पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेस पक्षातर्फे केले आहे. पिक कर्जात मत्स्योद्योग व दुग्धव्यवसायसाठीही कर्ज मिळणार आहे. यात एक लाख 60 हजारपर्यंत विनातारण कर्ज वाटपाची सुविधा आहे. यात एक लाखापर्यंत बिनव्याजी वरील रकमेसाठी तीन टक्क्याने कर्ज वाटप होणार आहे.