जळगाव । केशवस्मृती प्रतिष्ठान व आर.सी.बाफना फाउंडेशन ट्रस्ट संचलित मांगीलाल नेत्रपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने भास्कर मार्केट येथील जैन संघटनेच्या सभागृहात किर्तनकारांची सहविचार सभा झाली. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या सभेचे उद्घाटन करण्यात आले़. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एन.एस.चव्हाण, शाखाहार प्रणेते रतनलाल बाफना, हभप दिनकर महाराज कडगावकर, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, उपाध्यक्ष निळकंठराव गायकवाड, सचिव रत्नाकर पाटील, दिपस्तंभचे समन्वयक प्रज्ञाचक्षू प्रा. राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. प्रास्ताविकात नेत्रपेढीचे संचालक श्री. तुषार तोतला यांनी नेत्रपेढीच्या कामकाजाबद्दल माहिती देत उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
विशेष उल्लेखात त्यांनी जैन व मारवाडी समाजात धर्मगुरूंच्या उपदेशांमुळे नेत्रदानाची टक्केवारी अधिक असल्याचे नमूद केले. याचेच सूत्र धरून त्यांनी किर्तनकारांचा सामाजिक प्रभाव नेत्रदान चळवळीसाठी प्रभावी असल्याचे आग्रहाने प्रतिपादन केले. यावेळी रतनलालजी बाफना यांनी मनोगतातून नेत्रपेढीचे प्रकल्प प्रमुख संचालक व कर्मचारी जीव ओतून नेत्र दानाच्या चळवळीचे काम करत आहेत़ त्याला कीर्तनकारांच्या माध्यमातून हातभार लागणार असल्याचे सांगितले़ भरत अमळकर यांनीही कीर्तनकार हे सर्व समाजापर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम असून त्याद्वारे प्रत्येकापर्यंत नेत्रदानाबाबत जनजागृती होईल असे सांगितले. नेत्रतज्ञ डॉ़ स्वप्निल कोठारी यांनी नेत्रदान व नेत्ररोपण यावर सविस्तर माहिती दिली़ यावेळी नेत्ररोपणाने दृष्टी मिळालेले शिरसोली येथील नबाबाई महाजन व अमळनेरातील सागर पाटील, रंगराव पाटील यांनीही आपले अनुभव कथन दृष्टी मिळाल्याने पुर्नजन्म मिळाल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले़. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री डोल्हारे तर आभार नेत्रपेढीचे संचालक शिवाजीराव भोईटे यांनी मानले.
नेत्रदानाविषयी मार्गदर्शन
सहविचार सभेसाठी जिल्हाभरातील ठिकठिकाणाहून शंभर कीर्तनकारांची उपस्थित होती़ तसेच नेत्रपेढीचे प्रकल्प प्रमुख शरद कोत्तावार, संचालक सचिन चोरडिया व डॉ. धिरज बडाले, डॉ. रेणुका चव्हाण उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात हभप दिनकर महाराज कडगावकर यांनी उपस्थित कीर्तनकारांना कीर्तनातून नेत्रदानाचा सामाजिक संदेश पोहचविण्याचे आवाहन केले़ त्याला सर्व कीर्तनकारांनी पाठिंबा दर्शविला़ यावेळी उपस्थित कीर्तनकारांना सहभाग प्रमाणपत्र उपचाराबाबतचे सवलत पत्र देण्यात आले़.