पुणे । संतांचे विचार आणि त्यांचे चरित्र कीर्तनाच्या माध्यमातून सादर करण्याचा आनंद कीर्तनकार घेत, स्वत:ला प्राप्त झालेला ज्ञानाचा ठेवा ते इतरांपर्यंत पोहचवित असतात. जितके कीर्तनाचे प्रयोग केले जातात, तितके कीर्तन समृध्द होत जाते. ज्ञानाचा हा दीप तेवत ठेवणे अतिशय आवश्यक आहे. कीर्तन खजया अर्थाने तेव्हा समृद्ध होईल जेव्हा ते वेगवेगळ्या माध्यमातून समोर येईल, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार हभप विश्वासबुवा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि प्रबोधन भारती यांच्या वतीने सात दिवसीय नारदीय कीर्तन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तन वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हभप ताराताई देशपांडे, राजाराम देशपांडे, नामदेव शिंपी दैवज्ञ मंडळाचे रमेश मेहेर, संदीप लचके, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे शाहीर हेमंत मावळे, हभप प्रा. संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, युवा शाहीर होनराज मावळे, मुकुंद कोंढे आदी उपस्थित होते.
आत्मविश्वास व प्रोत्साहन मिळते
नारदीय कीर्तन प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय कीर्तनकार हभप विश्वासबुवा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या सात दिवसीय कीर्तन प्रशिक्षण वर्गाचा समारोप हभप ताराताई देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, कीर्तनकार जेव्हा कीर्तन करतो तेव्हा त्या कीर्तनाच्या मर्मातून आपल्याला आत्मविश्वास आणि प्रोत्साहन मिळते. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या माध्यमातून उत्तम कीर्तनकार घडविण्याचे काम सुरू आहे. असेही त्या म्हणाल्या. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप लचके यांनी आभार मानले.