चाळीसगाव । शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यात मुख्यमंत्री समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी ग्रामीण भागात विस्तारीत शिबीरे घेण्यात येत आहे. त्यानुसार तालुक्यातील कुंझर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शनिवारी विस्तारीत शिबीराचे आयोजन तसेच राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा कुंझरभुषण ग्रामसन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, आमदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती पोपट भोळे, पंचायत समितीच्या सभापती स्मितलताई बोरसे, तहसीलदार कैलास देवरे, राजीव गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष के. बी. साळुंके, कुंझर गावाचे सरपंच रंजनाताई गढरी, दिनेश बोरसे, वसंतवाणी तसेच ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया उपस्थित होते.
मुख्यमंत्री समाधान शिबीरांतर्गत विस्तारीत शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरातील योजनांचा नागरीकांनी लाभ घ्यावा. शासन शेतकर्यांसाठी जलयुक्त शिवार सारख्या योजना राबवित आहे. जलयुक्त शिवारामुळे आपल्या भागात पाण्याची समस्या सुटेल. कुंझर गावाचा क वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या गावातील मंदिरांचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जळगाव ते मुंबई ही विमानसेवा 23 डिसेंबर पासून सुरु होणार असून यासाठी विमानभाडेही कमी असल्याचे सांगण्यात आले. शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत चाळीसगाव तालुक्यात मुख्यमंत्री समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने तालुक्यात ठिकठिकाणी विस्तारीत शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. कुंझर येथे आयोजित केलेल्या या शिबीरात महसुल, कृषी विभाग, आरोग्य विभाग याचबरोबर महिला, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. नागरिकांनी या योजनांची माहिती करुन त्याप्रमाणे अर्ज करावेत असे आवाहन आमदार उन्मेश पाटील यांनी केले.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत महालॅबतर्फे मोफत रक्त तपासणी करण्यात येत आहे. गावातील लोकांनी आपल्यासोबत आपल्या आई-वडीलांच्या रक्ताची चाचणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. सर्व चाचण्या याठिकाणी मोफत करण्यात येत आहे. तसेच कुंझर गावाचा नावलौकीक वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. डाव्या कालव्याचे कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. येत्या 10 महिन्यात रस्त्यांची स्थिती चांगली असेल.
लाभ घेण्याचे आवाहन
काम करतांना आई-वडीलांचा आदर्श समोर ठेवावा. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालल्यास आपल्या हातून चांगले कार्य घडते. तसेच सर्वांनी शासनाच्या बेटी-बचाओ, अवयवदान या चळवळीत भाग घ्यावा. शासनाच्या योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचल्या तर गावाचा विकास होईल. यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन किशोर कुंझरकर यांनी सत्काराला उत्तर देतांना केले. आयोजित शिबीरात आमदार उन्मेश पाटील यांच्यासह तहसिलदार कैलास देवरे व इतर अधिकार्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या शिबीरात परिसरातील पोहरे, कळमडू, आभोणे, राजमाने आदी गावांमधील नागरीक उपस्थित होते.