आत्महत्या की खून ? चौकशी करण्याची मागणी
चाळीसगाव – भारतीय सेनेत असलेल्या जवानाच्या 26 वर्षीय पत्नीचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह दिनांक 4 रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कुंझर येथील राहत्या घरी मिळून आला. मयताच्या आई-वडीलांनी घातपात झाल्याचा आरोप केल्याने धुळे येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. कुंझर येथील रामचरण बैरागी हे ग्वाल्हेर येथे भारतीय सैन्यदलात आहेत तर त्यांची पत्नी प्रियंका रामचरण बैरागी (26) या कुंझर येथे सासु, सासरे, सासुची आई, दिर व दोन मुलांसह राहत होती. 2 रोजी सासरे हे मुलाला भेटण्यासाठी ग्वाल्हेर येथे गेल्याने विवाहिता प्रियंका, सासु, सासुची आई, दिर व दोन लहान मुले हेच घरी होते तर सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास प्रियंका बैरागी यांचा बेडरुम मध्ये छताला गळफास घेतलेल्या स्थितीत मिळुन आल्या. त्यांचा मुलगा जोराने रडत असल्याने हा प्रकार समजला. ही माहिती मयताच्या घरच्यांना माहिती पडल्यावर मयत प्रियंका यांचे आई, वडील, काका व भाउ हे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीने गळफास घेतला की तिचा खुन झाला ? असा आरोप करीत चौकशीची मागणी केली शवविछेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रीया पार पडेल अशी माहिती तपासी अधिकारी हेमंत शिंदे यांनी दिली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.