अमळनेर प्रांताधिकारी सिमा अहीरे यांचे आश्वासन
अमळनेर- येथील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मध्यवस्तीतील कुंटणखाना स्थलांतरीत करणेबाबत युथ सेवा फाउंडेशन,मुस्लिम युथ फाउंडेशनने सामाजिक कार्यकर्त्यांनी चळवळ सुरू करून कुंटणखाना हलविण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार कुंटणखान्यात व्यवसाय करणार्या महिलांचे समुपदेशन करून त्यांना पर्यायी व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी सिमा अहीरे यांनी दिले.
गेल्या काही दिवसापुर्वी युथ सेवा फाऊंडेशन व मुस्लिम युथ फाऊंडेशन यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन अमळनेर शहरातील कुंटणखाना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी स्थानिक प्रशासनाला बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी सिमा अहिरे यांच्या दालनात या विषयावर प्रशासनाच्या विविध अधिकार्यांसह बैठक पार पडली.
बैठकीत झालेल्या चर्चेत उपस्थितांनी, अमळनेर येथील कुंटनखाना व्यवसायाचा त्रास स्थानिक रहिवाश्याना वर्षानुवर्षे मोठ्या प्रमावणावर होत आहे. गुन्हेगारीसह बाहेरगावच्या ग्राहकांमुळे होणारा त्रास, मुलींचे विवाह न जुळणे, जुळलेले विवाह तुटणे, अपमानास्पद व हीन भावनेने पाहणे अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या व्यथा मांडल्या. अमळनेरच्या पु.सानेगुरुजींची कर्मभूमी, प्रतिपंढरपूर, मंगळग्रह मंदिर, अध्यात्मिक नगरी अश्या लौकिकास या वस्तीमुळे काळिमा फासला जात असल्याची भावना यावेळी झालेल्या बैठकीत रियाज मौलाना, गुलाम नबी, गुलविरसिंग कॉलरा, प्रकाश शहा, अमजद अली, कुदरत अली, जहुर पठाण, नगरसेवक प्रविण पाटील, रणजित शिंदे यांनी व्यक्त केली.
परीसरात सीसीटीव्ही कॅमेर बसविणार
प्रांताधिकारी सिमा अहिरे यांनी नगरपरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप गायकवाड,अभियंता संजय पाटील यांच्याकडून परिसरातील माहिती जाणून घेतली. पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी वेळोवेळी केलेल्या कायदेशीर कारवाईबाबत माहिती देत पोलिस प्रशासन सर्वोतोपरी लक्ष घालेल असे सांगितले. जिल्हा कौशल्य विकास अधिकारी अनिसा तडवी यांनी व्यवसायिक प्रशिक्षणाचे पर्याय सुचविले.
याप्रसंगी स्थानिक राहिवाश्यांनी व युथ सेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठविल्याने आमच्यावर खोट्या केसेस झाल्याची व जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची आपबीती झालेल्या चर्चेत सांगितली. गुन्हेगारी समस्या, बाहेरच्यांचा वावर,परराज्यातील वाहने व माणस यांच्यामुळे निर्माण होणार्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत म्हणून प्राधान्याने कार्यवाही करावी अशी मागणीही रियाज मौलाना, रणजित शिंदे, प्रविण पाटिल यांनी केली. या बैठकीत मसूद मिस्तरी, अखतर अली, सैय्यद शराफत अली, नावेद शेख,जाकीर शेख, हाशम अली, कमरअली शहा, रहीम मिस्तरी, शेर खाँ पठाण,अय्युब मिस्तरी, सुलतान खान, इम्रान खाटीक, जाकीर शाहरुख, हाजी मुझफ्फर अली, जहुर मुतवल्ली,आबिद अली, मुस्तफा प्लंबर, सईद सैलानी ,आरिफ भाई आदी उपस्थित होते.