धुळे । तालुक्यातील कुंडाणे ते वार या गावापासून गोंदूरकडे जाणार्या रस्त्यावर पांझरा नदीवर पुलाचे बांधकाम मंजूर झाले आहे. या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे 7 कोटी रुपये खर्चाची तरतूद केल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी कळविले आहे, अशी माहिती माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी दिली आहे. याठिकाणी पुलाच्या कामासाठी अनेक दिवसापासून मागणी होती.
संकल्पचित्र विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले
वार, कुंडाणे, वरखेडे या गावांना ये-जा करण्यासाठी पांझरा नदीवर पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी प्रा.शरद पाटील यांनी केली होती. यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता. प्रस्तावित पुलाची लांबी 200 ते 220 मीटर एवढी असणार असून रुंदी 7.50 मीटर इतकी असेल. गोंदूर, वार, कुंडाणे रस्ता प्रजिमा 21 वर या पुलाचे बांधकाम होणार असून कमी उंचीचा बुडणारा पूल असा या पुलाचा प्रकार आहे. पुलाची संकल्पना नाशिक येथील संकल्पचित्र विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. येत्या 8 महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल. साधारण जानेवारी 2018 पर्यंत हा पूल वापरासाठी खुला होईल, अशी अपेक्षा आहे. या पुलामुळे सडगाव, बल्हाणे, अजनाळे, सांजोरी मार्गे गोंदूर, निमडाळे, वार गावांकडे जाणार्या प्रवाशांची सोय होणार आहे. या पुलाच्या मंजुरीसाठी ना.चंद्रकांत पाटील, ना.दादा भुसे, विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे यांचे सहकार्य मिळाले.