कुंड्यापाणी गावातील आदिवासी दाम्पत्यांची जातपंचायतीच्या जाचातून सुटका

0

अडावद । महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या अथक प्रयत्नानंतर जून 2017 ला सामाजिक बहिष्कारावर बंदि आणण्याकरिता प्रतिबंध करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली असली तरी या अधिनियमाचा अजुन योग्य प्रचार आणि प्रसार न झाल्याने शिक्षणा पासून वंचित असलेल्या दुर्गम भागात 21शतकातही जातपंचायातीच्या जाचातून अनेकांचे शोषण होत असल्याचे दिसुन येते. अश्याच प्रकारच्या चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी या गावातील आदिवासी दाम्पत्यांची महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती तसेच अडावद पोलिस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या समयसुचकता आणि पुढाकारातुन जातपंचायतीच्या जाचातून कायमची सुटका मिळाली असुन समाज प्रबोधनाचा वसा घेतलेल्या अंनिस, पोलिस आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रबोधनातून आदिवासी भागातील जातपंचायतीची अनिष्ट रूढी, परंपरा हद्दपार होण्यास मदतच होणार आहे.

चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी परिसरातील अनिष्ट प्रथा हद्दपार होणार
चोपडा तालुक्यातील अडावद पो.स्टे.हद्दीतील कुंड्यापाणी हे सातपुडा पायथ्यालगत असलेले छोटेसे खेडेगाव. या गावातील रहिवासी बाळू नूरा पावरा यांची विवाह सोयरीक साधारणतः 5 ते 6 वर्षापूर्वी जवळच असलेल्या वरगव्हाण ता.चोपडा येथे झाली. त्यानंतर बारेला उभयंताचा संसार सुखरुप सुरु होता. या कुटूंबाला दोन अपत्य झालेत. मध्यतंरी या उभयंतामध्ये काही वाद झाले. ते विकोपाला गेल्याने ते विभक्त राहू लागले. वर्ष दोन वर्षाचा कालावधी गेल्याने दोघा नवरा बायको मधील गैरसमज, वाद मिटून ते पुन्हा गुण्या गोंविदाने संसाराचा रहाटगाडा सुरु करण्यासाठी एकत्र आलेत. परंतु त्यांच्या गावातील काही अशिक्षित पंचानी पुन्हा एकत्र संसार करायचा असल्यास दोघा नवरा बायको यांना प्रत्येकी 50 हजार रुपये असा एक लाखांचा दंड ठोठावला. गरीब आदिवासी दाम्पत्याला हा जाचक दंड भरणे शक्य नसल्याने त्यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याद्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यानंतर 11 रोजी कार्याद्यक्ष प्रा.डिंगबर कट्यारे, अंनिसचे चोपडा तालुका अद्यक्ष डॉ.अय्युब पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते पी.आर.माळी, जितेंद्रकुमार शिंपी यांनी अडावद पोलिस स्टेशन गाठून सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांची भेट घेतली. यावेळी पिडीत दाम्पत्यांनी आपल्यावर पंचानी लादलेला आर्थिक दंडात्मक शिक्षे बाबत आपबिती
कथन केली.

यशस्वितेसाठी यांनी केले प्रयत्न
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी कुंड्यापाणी येथील काहि रहिवाश्यांना बोलावून त्यांना प्रचलित कायदा आणि या कायद्याचे पालन न केल्यास गुन्हा दाखल होवून त्यातील शिक्षेची तरतूद आदी विषयी माहिती दिल्याने गावकर्‍यांनी ही बाब मान्य करीत सामाजिक बहिष्कार या अनिष्ट रुढी चे उच्चाटन करुन बाळू पावरा या दाम्पत्यांस यापुढे कोणताही त्रास होणार नाही असे अश्‍वासन सपोनि जयपाल हिरे यांना यावेळी कुंड्यापाणी येथील रहिवाश्यांनी दिले. यावेळी बाळू पावरा, रुपसिंग बारेला, वाहर्‍या बारेला, वजिर बारेला, रेंमसिंग बारेला, किरना बारेला, सहाय्यक फौजदार विठ्ठल धनगर, पो.हे.कॉ.रविंद्र साळुंके आदींची उपस्थिती होती. यावेळी अंनिसचे तालुकाध्यक्ष डॉ. अय्युब पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते पी.आर.माळी, जितेंद्रकुमार शिंपी यांनीही सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची भुमिका बजावित जातपंचायतीच्या जाचातून आदिवासी दाम्पत्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेत.