नवी दिल्ली । टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेदांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नसून दोघांमधील पिढीत जे अंतर आहे त्यामुळे असे घडत असल्याचे मत टीम इंडियाचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. प्रशिक्षक वेगळ्या पिढीतील खेळाडू असून कर्णधार वेगळ्या पिढीतील असल्यामुळे प्रशिक्षकाची कार्यपद्धती वर्तमान पिढीपेक्षा जरा वेगळी असते. मैदानात जरी ते दिसून आले नाही, तरी अभ्यास सत्र किंवा संघ व्यवस्थापनाच्या वेळी हे अंतर दिसून येते त्यामुळे याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे गावसकर म्हणाले. यावेळी गावसकर यांनी अनिल कुंबळेंचे कौतुक करताना प्रशिक्षक म्हणून कुंबळेने चांगले काम केलेले आहे. गेल्या वर्षभरातील संघाची कामगिरी पाहिली, तर कुंबळेने चुकीचे काहीही केलेले नसल्याचे म्हटले आहे.
व्हिजन असणारा प्रशिक्षक असावा
टीम इंडियाच्या भविष्याचा विचार असणारा आणि संघासाठी काही तरी व्हिजन असणारा प्रशिक्षक असावा, असा सल्लाही गावसकर यांनी दिला. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपत आल्याने बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकाचा शोध घेणे सुरु केले आहे. विराट कोहलीसह टीम इंडियाचे अनेक सीनियर खेळाडू प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 4 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधी कुंबळे आणि कोहलीमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सल्लागार समितीचे सदस्य आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दोघांमध्ये समेट घडवून आणू शकतात. मात्र टीम इंडियाचा नवा प्रशक्षिक निवडण्याची जबाबदारीही याच तीन दिग्गजांवर सोपवण्यात आली आहे.