कुंभारवळण कचराप्रकल्पाची मागणी

0

सासवड : कुंभारवळण येथे कचरा प्रकल्पासाठी जागा मंजूर होऊनदेखील सासवड येथील पुरंदर हायस्कूलसमोर वन खात्याच्या जमिनीवर अनधिकृतपणे सासवड नगरपालिकेचा कचरा साठविण्यात येत होता. त्यावर तोडगा निघत नसल्याने डॉ. उदयकुमार जगताप यांनी 2013मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती.

न्यायाधिकरणाने पुरंदर हायस्कूल समोरील जमा केलेला कचरा कुंभारवळण येथील कचरा प्रकल्प होत असलेल्या ठिकाणी 31 मार्च 2015पर्यंत हलविण्याचे व मशीनरी बसवून कचरा प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु, न्यायाधिकरणाने आदेश देऊनही कचरा प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू न झाल्याने डॉ. जगताप यांनी न्यायाधिकरणात पुन्हा अवमान याचिका दाखल केली होती.

सद्यस्थितीत वर्गीकरण न करता कचरा कुंभारवळण येथे येऊ नये अशी सक्त ताकीद देऊनही कचरा वर्गीकरण केला जात नाही. प्रत्यक्षात नगरपालिकेकडून कुंभारवळण येथे क्वचितच कचर्याच्या गाड्या पाठविल्या जात आहेत. तेथ कोणतीही प्रक्रिया न करता व वर्गीकरण न करता कचरा साठवून ठेवला जात आहे. येथे बसविण्यात आलेल्या सर्व मशिनरी बंद आहेत. वीजपुरवठ्यासाठी डीपी बसविण्यात आलेल्या आहेत, पण अद्यापही वीजजोड दिली गेली नाही. रजिस्टरमध्ये कचरा गाड्यांच्या खोट्या नोंदी केलेल्या आढळून आलेल्या आहेत. उघड्यावर कचरा टाकल्याने कुंभारवळण परिसरातील पर्यावरणाचे प्रदूषण होण्याची भीती निर्माण झाली आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.