कुक्कुटपालन व्यवसायासाठी जिल्हा परिषदेकडून 70 लाखांची तरतूद; 741 लाभार्थ्यांना अनुदान

0

पुणे । शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या शेतीसोबत अन्य व्यवसाय करता यावा, यासाठी जिल्हा परिषदेने कुक्कुटपाल व्यवसाय योजना सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या कडकनाथ कोंबडीच्या अंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून, या व्यवसायामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने या योजनेसाठी 70 लाखांची तरतूद केली असून, या निधीतून 741 लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले आहे.

आरोग्यवर्धक कोंबडी
कडकनाथ कोंबडीच्या मांसामुळे मानवी आरोग्यावर कोणताही हानीकारक परिणाम होत नाहीत. आयुर्वेदीक गुणधर्म व आरोग्यवर्धक मासांमुळे हृदयविकार, कोलेस्ट्रॉलसारखे आजार बळावण्याचा धोका नाही. कुक्कुटपालनाच्या दृष्टीने अत्यंत किफायतशीर म्हणून या कडकनाथ कोंबडीकडे पाहिले जात आहे. स्थानिक वातावरणाशी जुळवून घेणारी व रोगप्रादुभार्वाला बळी न ठरणारी हे वैशिष्टपूर्ण गुण तिच्यामध्ये आहेत. तसेच पोल्ट्रीसारख्या अत्याधुनिक कंपाउंडची गरज या कुक्कुटपालनास नसते, तसेच विशेष खाद्याची जरुरी ही लागत नाही. देशी सर्वसाधारण कोंबडीप्रमाणे घरचे धान्य ही या कोंबड्यांना चालते. त्यामुळे लोकांना ही कोंबडी पाळण्यासाठी विशेष उपाय योजनेची गरज पडत नाही.

कडकनाथला चांगली मागणी
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कडकनाथ जातीचे 1 महिना वयाच्या 50 पक्षी, पक्षी खाद्यासाठी आणि पक्षांच्या औषधांसाठी अनुदान दिले जाते. या अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी कुक्कुटपालनाचा लघु उद्योग सुरू करू शकणार आहेत. यामुळे शेती व्यतिरीक्त कुक्कुटपालन व्यवसायातून शेतकर्‍यांना आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. कडकनाथ कोंबडीला चांगली मागणी असल्याचे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागातील अधिकारी डॉ. श्रीराम पवार यांनी सांगितले.

700 रुपये किलो
या कोंबडीच्या मांसाला आणि अंडीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बाजारात या कोंबडीचे मांस 600 ते 700 रुपये प्रति किलो दराने विकले जाते. तर 30 ते 40 रुपये प्रति दराने अंड्याला भाव मिळतो. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्याही वाढत आहे. तसेच, आरोग्यवर्धक मांसामुळे बाजारात या कोंबडीला मागणी आहे. यामुळे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या कोंबडीचा व्यवसाय करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.