पुणे : मुळशीतील पौड-लोणावळा रस्त्यावर कोळवण गावाजवळ सराईत गुन्हेगार पप्पू सातपुतेची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने पप्पू सातपुतेची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी रात्री 8.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सुशांत उर्फ पप्पू लक्ष्मण सातपुते हा त्याच्या राहत्या परिसरातील कुख्यात गुंड होता. त्याच्या गुंडगिरीच्या स्वभावामुळे त्याला पप्पू नावाने ओळखला जात होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि मारामारीचे काही गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वी त्याला याप्रकरणी तडीपार करण्यात आले होते. त्याची हत्या झालेल्या कोळवन परिसरात त्याचे यापूर्वीही भांडण झाले असल्याचे समजतेे. त्यामुळे त्याला मारण्यातही कोळवन परिसरातीलच काही युवकांचा हात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या रवींद्र सातपुते याच्यावरही हल्ला करण्यात आला असून, तो जखमी झाला आहे.