कुटुंबांची जबाबदारी सांभाळत महिला विविध क्षेत्रात पुढे

0

जळगाव। असंख्य अडचणींवर मात करत, कुटुंबांची जबाबदारी सांभाळत सुवर्णकार समाजातील महिला विविध क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. या महिलांना बघितल्यावर वाटत की, महिला खरोखर आता सक्षम झाल्या आहेत ही समाजासाठी मोठी गोष्ट आहे. इतर समाजासमोर महिलांनी आदर्श उभा केला असून प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत मात्र हा आदर्श ठेवताना महिलांनी आपली संस्कृती ही जोपासली पाहिजे असे मत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सुवर्णकार सेना व अखिल सुवर्णकार महिला मंडळ यांच्यातर्फे जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमिवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

68 महिलांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार
महाराष्ट्र सुवर्णकार सेना व अखिल सुवर्णकार महिला मंडळ यांच्यातर्फे जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमिवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील 68 महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार स्मिता वाघ, जिल्हा नियोजन समिती सदस्या रेखा वानखेडे, स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सरस्वती पातोंडेकर, अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या संस्थापिका लिला सोनार, पाचोरा मनपाच्या नगरसेविका हर्षाली जडे, जळगाव मनपाच्या नगरसेविका लता मोरे, स्त्रीरोग तज्ञ पूनम दुसाने, संकल्प व्यसनमुक्ती केंद्र जामनेरच्या शालीनी सोनार, कार्तिकी डिसाईन वेअर्सचे संचालिका मिनाक्षी सोनार, आकाशवाणी उद्घोषिका वीणा वानखेडे, डॉ सविता बहाळकर उपस्थित होत्या.

मनोगत केले व्यक्त
समाजातील वैद्यकीय, क्रीडा, पत्रकारिता, शासकीय सेवा, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या 68 महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यानंतर सन्मान झालेल्या महिलांनी कार्यक्रमात आप-आपली मनोगत व्यक्त केलीत. तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राजश्री पगार व केतन सोनार यांनी सूत्रसंचालन केले तर शालीनी बागुल यांनी आभार मानले. यावेळी सोहळ्यात महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली होती. तसेच त्यांच्या कुटूंबिय सदस्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.