कुटुंबात वडिलांची भूमिका

0

मानवी जीवनात आई-वडील हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. परंतु, वडिलांपेक्षा आपण सर्वच जण आईला सर्वात जास्त महत्त्व देतो. कारण आई ही प्रत्येक मुलाला आपल्या उदरात नऊ महिने नऊ दिवस अतिशय काळजीपूर्वक सांभाळ करते. गर्भात जुळलेली नाळ आयुष्यभर टिकून राहते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिचा आणि मुलाचा जिव्हाळ्याचा, प्रेमाचा संबंध असतो. आई ही प्रेमळ, मायाळू आणि मुलांना समजून घेणारी असते, तर याउलट वडील हे कठोर, कडक, शिक्षा करणारे आणि मुलांना न समजून घेणारे असतात, असे जनमानसात आई-वडिलांविषयी बोलल्या जाते. परंतु, खरोखरंच प्रत्येक वडील एवढा कठोर किंवा निष्ठुर असतो का? साहित्याच्या क्षेत्रातसुद्धा आईवर बर्‍याच साहित्यिकांनी विपुल लेखन केलेले आढळून येते. मात्र, त्या प्रमाणात वडिलांवर आधारित लिहिलेले साहित्य फार कमी म्हणण्यापेक्षा नगण्यच आहे.

मराठवाड्यातील कवी इंद्रजित भालेराव यांनी ’बाप’ या कवितेद्वारे समाजातल्या वडील मंडळींना एक प्रकारे न्याय मिळवून दिला आहे. घरकाम करणारी व सतत मुलांच्या सहवासात राहणारी ती म्हणजे आई. त्यामुळे त्यांच्यात जवळीकता निर्माण होते आणि ते आईसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतात, तर वडील मात्र कामानिमित्ताने नेहमी घराबाहेरच राहतात. त्यांचा सहवास मुलांना फार कमी मिळतो. त्यास्तव मुले आणि वडील यांच्यात जवळीकता निर्माण होत नाही. त्यामुळे मुले वडिलांना थोडसे घाबरतात. वडील हे घराचे कर्ते, सवरते, त्यास्तव घरातील विविध जबाबदारी पूर्ण करण्यासाठी नेहमी विचार प्रक्रिया चालूच ठेवावी लागते. कधी कधी बाहेरील कामाचा ताण किंवा आर्थिक बाबींची समस्या त्यांच्या डोक्यावर नेहमीच जाणवत असते. त्यास्तव वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचे प्रकार वडिलांकडून प्रत्येक घरात होऊ शकते यात शंका नाही. त्याचे परिणाम लहान मुलांवर होतात. बालपणापासून रागात वा संतापात पाहिलेल्या वडिलांची प्रतिमा नेहमीसाठी त्यांच्या स्मरणात राहते. त्यामुळे ती मुले वडिलांसमोर बोलण्यासाठी घाबरतात, भितात किंवा कचरतात. भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. येथे घरातील सर्व लहान-मोठे काम स्त्रियांनी करायचे आणि घराबाहेरील कामे पुरुषांनी करायची, अशी प्रथा आहे.

(सध्याच्या काळात यात हळूहळू बदल होत आहे ते चांगले आहे की वाईट ते येणारा काळच ठरवेल.) पुरुषांची सर्व कामे फारच जबाबदारीची, त्यामुळे ती पेलताना पुरुष म्हणजे घरातील वडील नेहमीच तणावात दिसून येतो. त्याचाच परिणाम त्यांच्या वागण्या-बोलण्यावर होत असतो. म्हणूनच आज समाजात आईला जेवढे मोठे स्थान मिळाले तेवढे मोठे स्थान वडिलांना मिळत नाही. मात्र, ते स्थान प्राप्त करणे फार जिकिरीचे वा कठीण काम नाही. त्यासाठी प्रत्येक वडिलांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आईकडून मुलांना कौटुंबिक संस्कार मिळतात तर सामाजिक संस्कार वडिलांकडून मिळतात. प्रत्येक मुलावर वडिलांचे आनुवंशिक गुणधर्म फार मोठ्या प्रमाणात संक्रमित होतात. प्रत्येकजण आपल्या वडिलांसारखा नाव कमावण्याची इच्छा बाळगतो. समाजात वडिलांची प्रतिमा चांगली किंवा वाईट अशी असेल त्याच पद्धतीवर मूल चालते. तेव्हा समाज सहज बोलून जातो की, हा तर आपल्या बापाच्या चालीवर गेला आहे. आपल्या मुलांना समाजात चांगली जागा मिळावी, इज्जत मिळावी, लोक त्यांना मान द्यावे असे वाटत असेल, तर प्रत्येक वडिलांनी समाजात चांगले वागण्याचे ध्यानात घ्यावे. आपली इतरांशी वागणूक चांगली ठेवावी. खोटे बोलून कोणाला फसवू नये, प्रत्येकाशी प्रेमाने व सौजन्याने वागावे. वाईट व्यसनांची सवय ठेवू नये. आपल्या वाईट सवयी हळूहळू आपले मूल विशेषकरून मुलगा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. दारू पिणे, तंबाखू खाणे, पत्ते खेळणे, विडी वा सिगारेट पिणे, रिकामटेकडे राहून गप्पा मारणे इत्यादी वाईट सवयी लहानपणापासून बघत आल्याने त्याच्या मनात त्याविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी आकर्षण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अजून एक नुकसान संभवू शकते. घरात व्यसनी लोकांचे काहीच स्थान नसते, बोलणे कोणी ऐकत नाही आणि आपला स्वाभिमान संपतो. दुसर्‍याला उपदेश करूच शकत नाही.

’मी सांगतो लोकाला शेंबूड माझ्या नाकाला’ उक्तीप्रमाणे वागणे निश्‍चित जमणार नाही. मुलांवर योग्य संस्कार टाकण्याची फार मोठी जबाबदारी वडिलांवर आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्याच्या वेळेपर्यंत वडिलांच्या सर्वच वागणुकीची आणि वर्तणुकीची मुले अगदी बारकाईने निरीक्षण करतात. एखाद्या टीप कागदाप्रमाणे आपल्या वर्तनाचे ते अनुकरण करतात. हे प्रत्येक वडिलांनी ध्यानात घेऊन पाऊल टाकल्यास आपले नावसुद्धा नक्कीच उज्ज्वल होईल. माझे घरात कोणीच ऐकत नाही, मानीत नाही अशी तक्रार करणार्‍या वडिलांनी सर्वप्रथम स्वत:चे आत्मपरीक्षण करून आपल्या अंगी असलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच मानाचे स्थान मिळू शकेल. वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी आणि समाजात वडिलांचे असलेले प्रतिबिंब बदलावयाला हवे. सार्‍याच वडिलांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागे करून जीवन जगल्यास आणि मुलांसमोर चांगले वर्तन ठेवल्यास आईला जसे प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू ही उपाधी मिळाली तशीच उपाधी वडिलांनाही मिळू शकते. प्रत्येक अपत्याने वडिलांच्या अस्मितेला धक्का लागणार नाही, असे जीवन जगणे आवश्यक आहे. पितृदेवो भव म्हणजे पित्याला देव माना, असे संस्कृतमधील श्‍लोकात सांगितले आहे. त्या उक्तीचा विचार करून आज जागतिक पालकदिनी आपण सर्व वडील मंडळी एकदा स्वतःचे आत्मपरीक्षण करू या.

आत्मपरीक्षण करू या…
आज जागतिक फादर्स डे आहे. मुलांवर योग्य संस्कार टाकण्याची फार मोठी जबाबदारी वडिलांवर आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्याच्या वेळेपर्यंत वडिलांच्या सर्वच वागणुकीची आणि वर्तणुकीची मुले अगदी बारकाईने निरीक्षण करतात. एखाद्या टीप कागदाप्रमाणे आपल्या वर्तनाचे ते अनुकरण करतात. हे प्रत्येक वडिलांनी ध्यानात घेऊन पाऊल टाकल्यास आपले नावसुद्धा नक्कीच उज्ज्वल होईल. वडिलांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागे करून जीवन जगल्यास आणि मुलांसमोर चांगले वर्तन ठेवल्यास आईला जसे प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू ही उपाधी मिळाली तशीच उपाधी वडिलांनाही मिळू शकते. प्रत्येक अपत्याने वडिलांच्या अस्मितेला धक्का लागणार नाही, असे जीवन जगणे आवश्यक आहे. पितृदेवो भव म्हणजे पित्याला देव माना असे संस्कृतमधील श्‍लोकात सांगितले आहे. त्या उक्तीचा विचार करून आज जागतिक पालकदिनी आपण सर्व वडील मंडळी एकदा स्वतःचे आत्मपरीक्षण करू या.

– नागोराव सा. येवतीकर
सामाजिक कार्यकर्ते ता. धर्माबाद
9423625769