कुटुंबात वृद्धाश्रमाचा निर्णय सामंजस्याने व्हावा

0

‘अंतरंग वृद्धाश्रमाचे’ कार्यक्रमातील सूर

प्रभा दळवी आणि स्वाती सामक यांच्या मुलाखतीतून उलगडले वृद्धाश्रमाचे अंतरंग

पुणे : वृद्धाश्रम शाप की वरदान या प्रश्‍नाचे थेट उत्तर देणे तसे अवघड आहे, कारण मानसिक किंवा शारिरीक दृष्टया विकलांग असणार्‍या व्यक्तिंना घरी एकटे ठेऊन घरातील नोकरदार मुलगा आणि सून कामाला जाऊ शकत नाही. पंरतू खोटेनाटे कारण सांगून पालकांना विश्‍वासात न घेता सामंजस्याने निर्णय न घेता त्यांना परस्पर वृद्धाश्रमात सोडून येणार्‍या मुलांची उदाहरणे समाजात दिसून येतात. त्यामुळेच वृद्धाश्रम शाप की वरदान या प्रश्‍नाचे थेट उत्तर देता येणे कठीण असून कुटुंबात वृद्धाश्रमाचा निर्णय सामंजस्याने व्हावा, असा सूर ‘अंतरंग वृद्धाश्रमाचे’ या प्रकट मुलाखतीत उमटला.

चंचल काळे यांचा गौरव

कविता रसिक मंडळी अर्थात करम या संस्थेतर्फे ’अंतरंग वृद्धाश्रमाचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संकल्प सेवाधामच्या संचालिका प्रभा दळवी आणि कवियत्री स्वाती सामक यांच्या प्रकट मुलाखतीतून वृद्धाश्रमाचे अंतरंग उलगडत गेले. करमच्या सुप्रिया जाधव यांनी दोघींची प्रकट मुलाखत घेतली. स्व. विमल लिमये यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मनस्विनी काव्य पुरस्काराने प्रसिद्ध कवियत्री चंचल काळे यांना गौरविण्यात आले. करम संस्थेचे संस्थापक भूषण कटककर आणि संचालिका सुप्रिया जाधव यांच्या उपस्थितीत वासंती ब्रम्हे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रभा सोनवणे यांनी वृद्धाश्रमाविषयी मनोगत व्यक्त केले.

व्यावहारीक पातळीवर निर्णय

कामगारांना मिळणार्‍या तोकड्या पगारामुळे किंवा एंकदरीतच मानसिकतेमुळे कामगारांचे वृद्धाश्रमांच्या साफ-सफाईबाबत थोड दुर्लक्ष होते, पंरतू काही थोड्या त्रुटींकडे दुर्लक्ष केले तर वृद्धाश्रमात राहणे कधीही सोयीचे होते, असे कवयित्री स्वाती सामक यांनी सांगितले. वानप्रस्थाश्रमाचा काळ वृद्धाश्रमात घालविण्याबाबत नकारात्मक भूमिका न घेता व्यावहारीक पातळीवर निर्णय घेता आला पाहिजे. आपण सर्वसामान्य माणसे असल्याने आपणास सन्यासाश्रम कितपत झेपेल याबाबत शंका वाटते, परंतू वृद्धाश्रमांना नकारात्मक किनार देऊ नये, असे त्यांनी पुढे सांगितले.

वृद्धांना समजून घेणे गरजेचे

वृद्ध व्यक्ती ही लहान मुलासारखीच असते. लहान मुलांना जसे अनेक प्रसगांत समजून घ्यावे लागते त्याचपद्धतीने वृद्धांना समजून घेणे गरजेचे असते. वृद्धाश्रम सुरू करताना सुरूवातीला खूप अडचणी आल्या. पंरतू समाजातील दातृत्व असेल्या व्यक्ती आणि संस्थांनी मला भरघोस मदत केली. अनेकदा काही वृद्धांना वृद्धाश्रम स्विकारणे कठीण जाते. पंरतू त्यांना रुळायला योग्य तो वेळ दिल्यास ते वृद्धाश्रम स्विकारतात आणि रोजच्या कार्यात सहभागी होतात. कधीकधी एकाच खोलीत राहणार्‍या दोन वृद्धांमध्ये वाद होतो पंरतू तो कधीच विकोपाला जात नाही, असे संकल्प सेवाग्राम ट्रस्टच्या प्रभा दळवी यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. चिन्मयी चिटणीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर वर्षा कुलकर्णी यांनी आभार मानले.