मोयखेडा बुद्रुकच्या तरुणीचा मृत्यू
तरुणाची प्रकृती उत्तम
जळगाव- कुटुंबियांचा लग्नाला नकार मात्र एकमेकांवर जीवापाड प्रेम असल्याने एकमेकांशिवाय जगू शकत नाही, असे म्हणत जामनेर तालुक्यातील मोयखेडा बुद्रूक गावातील प्रियकर-प्रेयसीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात प्रेयसी तरुणी आश्विनी प्रविण पाटील (वय 21) हिचा मृत्यू झाला असून प्रियकर तरुण दिपक भगवान लोखंडे याला अंत्यवस्थ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे. फर्दापूर गावातील एका शेतात दोघे मिळून आल्यानंतर रविवारी सकाळी ही घटना समोर आली आहे.
प्रियकर दिपक याने जिल्हा रुग्णालयात दिलेल्या माहितीनुसार, असे की , दिपक व आश्विनी एकाच गावातील आहे. इयत्ता नववीत असल्यापासून दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. वय वाढत गेले तसे दोघांमधील प्रेमही फुलले. दोघांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. मात्र नोकरी नसल्याने दिपकही हतबल होता. एका हॉटेलातही काम केले. यानंतर त्याला विमानतळ प्राधीकरण औरंगाबाद येथे कॅशिअर पदी नोकरी लागली. मात्र कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. याच विवंचनेत दोघांनी 8 रोजी घर सोडले. शैक्षणिक कागदपत्रांसह फर्दापूर गाठले. लग्न जर झाले नाहीतर एकमेकांशिवाय कसे जगायचे म्हणून दोघांनी विषप्राशन करण्याचा निर्णय घेतला. फर्दापूर गावानजीक असलेल्या एका शेतात दोघांनी विषप्राशन केले. दरम्यान आश्विनी मृत्यू झाल्याबाबतही माहिती दिपककडून लपविण्यात आल्याचे समजते.
शेतकर्यामुळे प्रकार उघड
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे नेहमीप्रमाणे शेतात गेलेल्या शेतकर्याला त्याच्या शेतात दिपक व आश्विनी पडलेले दिसून आले. त्याने याबाबत तेथील पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटील यांना फर्दापूर पोलिसांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दोघांना सोयगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी आश्विनीस मृत घोषित केले. व दिपक लोखंडे यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालय जळगाव येथे रवाना केले. दिपक सोबत फर्दापूर येथील पोलीस कॉन्स्टेबल चेतन ठाकरे व होमगार्डही जिल्हा रुग्णालयात थांबले आहे. पोलिसांनी दिपकच्या कुटुंबियांनाही फोन केला मात्र त्यांनी आमच्यासाठी मुलगा मेला असून तुम्हीच सांभाळा असा संताप करत फोन बंद केला. दिपकच्या माहिती मिळाल्यानुसार दिपकचा जळगावातील चुलत काकानेही रुग्णालय गाठले. पोलिसांसह तेही रुग्णालयात थांबले असून दिपकची प्रकृती उत्तम आहे.