शिकल्या, सवरलेल्या मुली जेव्हा स्वतःच्या आत्मकेंद्रीत स्वभावाच्या शिकार होतात; तेव्हा त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. प्रचंड बुद्धिमत्ता, आत्मनिर्भरता आणि आर्थिक सक्षमता यामुळे मुली स्वतःपुरताच विचार करू लागल्या आहेत. त्यामुळे ज्या सामाजिक अन् कौटुंबीक समस्या निर्माण झाल्यात, त्यावर आता गांभीर्यपूर्वक विचार व्हायला हवा. एकत्र कुटुंबपद्धतीवर खरे तर हे मोठे संकट आहे. कुटुंबे वाचवायची असतील तर मुलींच्या विचार अन् वर्तवणुकीत बदल करावा लागणार आहे.
स्त्री अत्याचार संपलेत असे आम्ही म्हणणार नाही. परंतु, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. स्त्री अत्याचारांच्या त्या पुरातन भयकथा आता कुठे प्रसारमाध्यम्यांत वाचायला मिळत नाहीत. हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, सासरच्यांनी तिला जीवंत जाळले, विहिरीत ढकलून दिले वैगरे वैगरे घटना आता समाजातून जवळपास हद्दपार झाल्या आहेत. काही ठिकाणी अशा घटना घडतही असतील; परंतु त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. याउलट परिस्थिती आता समाजात दिसू लागल्याचे प्राकर्षाने जाणवते. स्त्रीपीडित पुरुषांवरील अत्याचारांच्या घटना ठळकपणे सामोरे येत असून, त्या मोठ्या धोक्याची घंटा आहेत. मुळात स्त्री ही शरीराने कमकुवत असते, परंतु मनाने कठोर. तर पुरुष हा शरीराने मजबूत असला तरी मनाने कमकुवत असतो. समाजात स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. कारण, तो मनाने फारच कमजोर असतो. आता जेव्हा शिकल्या सवरलेल्या स्त्रिया स्वतःप्रती फार म्हणजे फारच सजग, आत्मकेंद्री झाल्याचे दिसून येते, तेव्हा पुुरुषांना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत असेल याची कल्पना करवत नाही. मुलगी शिकली प्रगती झाली, असे आपण म्हणतो. मुलापेक्षा मुलगी बरी, दोन्ही घरे उद्धारी; असेही आपण म्हणत असतो. परंतु, या शिकलेल्या अन् आत्मकेंद्रीत झालेल्या मुलीच संसाराचा गाडा हाकताना कमालीच्या असंवेदनशील झाल्या आहेत. मी, माझ्या मुठीत असलेला माझा पती अन् मला झालेले एखाद दुसरे अपत्य इतके छोटे विश्व त्यांनी तयार करून ठेवले आहे. त्यामुळे एकत्रित कुटुंबे म्हणजे या मुलींना नरकवास वाटू लागला असून, घरातली ‘डस्टबीन‘ त्यांना नकोशी झाली आहे. घरातील वडिलधारे, ज्येष्ठ म्हणजे सासू-सासरे वैगरे मंडळी या सुशिक्षित मुलींना डस्टबीन म्हणजेच कचराकुंडी वाटते, हे धक्कादायक वास्तव आम्हाला पुण्यात कळले. त्यामुळे सुखीसंसाराची स्वप्ने पाहाता ही डस्टबीन नकोत, अशी टोकाची भूमिका या मुली घेत आहेत. त्यामुळे अनेकांचे वृद्ध आई-वडिल वृद्धाश्रमांत पहावयास मिळत आहेत. ज्यांच्यासाठी खास्ता खाल्ल्यात, हाडे झिजवली त्यांनी म्हतारपणाची काठी होण्याऐवजी वृद्धाश्रमात रवानगी केल्यानंतर त्या वृद्धांवर काय आपत्ती कोसळत असेल, याची कल्पनाही करवत नाही. परंतु, हे वास्तव पुण्यात दोन घरटीआड पहावयास मिळत आहे. पुणे, मुंबई या शहराचे अनुकरण उर्वरित महाराष्ट्रात होत असते. त्यामुळे असंवेदनशीलतेचे हे लोण उद्या ग्रामीण भागातही झपाट्याने पोहोचू शकते. त्यामुळे गावकुसांतील ती आदरयुक्त कुटुंबपद्धतीही धोक्यात येण्याची भीती आम्हाला आता वाटू लागली आहे. तसे झाले तर ते महाराष्ट्राचे अन् मराठी संस्कृतीचे मोठे दुर्देव असेल. दोन दिवसांपूर्वी अभिनेता सैफअली खान याची एक मुलाखत वाचण्यात आली होती. त्यात त्याने नमूद केले होते, की ‘तुम्ही बेकार असल्याची, तुम्हाला काहीही किंमत नसल्याची जाणीव सतत करून दिली जाते; तेव्हा खूप वाईट वाटते. मलाही वाटत असे. ती (त्याची माजी पत्नी अमृता सिंग) नेहमी मला घालून-पाडून बोलत असे. आणि, माझ्या आईला तसेच बहिणीलाही शिव्या देत असे. मी बराचकाळ हे सहन केलं‘. अर्थात त्याची ही मुलाखत त्याच्या माजी पत्नी व अभिनेत्री अमृता सिंग यांच्याशी झालेल्या घटस्फोटाच्यानिमित्ताने घेतली गेलेली होती. प्रसंगाकडे दुर्लक्ष केले तरी, सैफ काय म्हणतो, ते मात्र अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या पिढीत पत्नी व पती असे दोघेही शिकलेले असतात व नोकरीही करतात. आज परिस्थिती अशी आहे, की पतीपेक्षा पत्नीला जास्त पगार, चांगली नोकरी असू शकते. कधी कधी पतीवर नोकरी जाण्याची किंवा तिच्यापेक्षा कमी पगाराची नोकरी पत्कारण्याचीही वेळ येत असते. अर्थात, जीवनात असले चढ-उतार हे होतच असतात. तशी वेळ आपल्या पतीवर आली म्हणून तिने त्याला हिणवायचे, कमी लेखायचे व त्याच्या बहिण-भाऊ, आई-वडिलांना छळायचे हे प्रकार सर्वार्थाने चुकीचे आहेत. दुर्देवाने तसे प्रकार या सुसंस्कृत पुणे अन् मुंबई शहरात आम्हांस दिसून आले आहेत.
कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे. एखादी स्त्री जेव्हा पोलिस ठाण्याची पायरी चढते तेव्हा पोलिसांची सहानुभूती ही तिच्याच बाजूने असते. बहुतांश पोलिस ठाणे हे पती-पत्नीच्या वादात पुरुषांना लुटण्याचेच काम करतात. त्याला धमक्या दिल्या जातात, वेळीअवेळी पोलिस ठाण्यात बोलावले जाते, कायद्याचा व कारवाईचा धाक दाखवून आर्थिकदृष्ट्या लुबाडले जाते. पोलिसांचा हा मानसिक छळ असह्य असतो, असा छळ जेव्हा संबंधित पुरुषाचा होतो तेव्हा त्या स्त्रिला एक विकृत आनंद मिळतो. ही विकृती हीच समाजाला लागू पाहात असलेली नवी कीड असून, ही कीड फोफावण्यापूर्वी समूळ नष्ट करणे गरजेची बाब आहे. इतिहासाचे अवलकोन केले असता, स्त्रियांवर मानसिक, सामाजिक, आर्थिक अशी सगळ्या प्रकारची गुलामगिरी लादली गेली होती, असे दिसते. आद्य समाजसुधारिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी तिची या गुलामगिरीतून सुटका केली. तिच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षणामुळे ती स्वयंपूर्ण होईल, प्रगल्भ होईल, तिला स्वतःचे अस्तित्व कळेल, कौटुंबीक व सामाजिक भान येईल, आणि तिच्याद्वारे जन्माला येणारी प्रत्येक पिढी सुशिक्षीत व सुसंस्कृत असेल, असे एक स्वप्न सावित्रीबाईंनी पाहिले होते. दुर्देवाने पुण्यातीलच सामाजिक, कौटुंबीक जीवन पाहिले असता, आज सावित्रीबाई असत्या तर त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. आज अनेक स्त्रियांच्या आत्मकेंद्रीत, आत्मप्रौढी वर्तवणुकीमुळे कुटुंबव्यवस्थाच अडचणीत सापडली असून, नवा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. स्त्रियांवरील पुरुषी अत्याचार निषेधाहर्र्च आहेत; परंतु, स्त्रियांद्वारे पुरुषांवर होणारे सगळ्याच प्रकारचे अत्याचार निषेधार्ह ठरविण्यासाठी आता समाजातील सुज्ञांनी एकत्र यायला हवे. ती काळाची नीतांत गरज आहे!