बारामती । शिर्सुफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांची हेळसांड होत असल्याचे समोर आले आहे. महिला रुग्णांची संख्या अधिक असल्याने त्यांना प्राथमिक सुविधा पुरविणे शक्य झाले नाही. ज्याप्रमाणे जनावरे कोंडावित तशी एकाच खोलीत 20 ते 30 महिलांना भूल देत विश्रांतीसाठी झोपवण्यात आले. यामुळे महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिबिरांची संख्या वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शिबिरास 5 रुग्णांची मर्यादा
शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शिर्सुफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दर महिन्याला शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाते. त्यानुसार बुधवार हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिर्सुफळ परिसरासह भिगवण, सणसर, डोर्लेवाडी येथील सुमारे 70 महिला दाखल झाल्या होत्या. रुग्णसंख्या 5 ची मर्यादा असताना एकावेळी 30 महिलांना दाखल करून घेण्यात आले. तर उर्वरित महिलांना शेजारील हॉलमध्ये दाखल करण्यात आले.
मूलभूत सुविधाही नाही
महिलांना या शस्त्रक्रियेपूर्वी बारा तास अन्नसेवन वर्ज्य करण्यास सांगण्यात आले होते. तसेच पोट साफ होण्याच्या गोळ्याही देण्यात आल्या होत्या. दाखल केलेल्या अनेक महिलांना मुलभूत सुविधाही नव्हत्या. त्यांना चटईवर झोपावे लागले. पुरेशी जागा नसल्याने काही महिला बाहेर पटांगणात बसून होत्या. तर त्यांची मुले, त्यांच्यासह आलेले नातेवाईक यांना तर बाहेर कुठे उन्हात तर कोठे झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा लागला. सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांची संख्या वाढली होती. यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. यापुढे योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असे बारामतीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगताप म्हणाले.