कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करणार्‍या दाम्पत्यांचा सत्कार

0

जळगाव । लोकसंख्या वाढ ही जगाल भेडसावणारी जटील समस्या आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. लोकसंख्या नियंत्रासाठी असलेल्या महत्त्वाच्या पर्यायापैकी एक म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया. दरम्यान जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील केवळ एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया केलेल्या दांम्पत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दरवर्षी 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. झेडपीतील छत्रपती शाहू महाराज सभागृहात सत्कार सभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 24 दांम्पत्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार असून दोन हजार रुपयाचा धनादेश तसेच पोस्टात कन्येच्या नावावर आठ हजार रुपये शासनातर्फे देण्यात आल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच जेव्हा कन्या 18 वर्षाची होईल तेव्हा पोस्टातुन पैसे काढता येणार आहे असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी.आर.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत अत्यूत्कृष्ट काम करणार्‍या प्रथम तीन तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, परिचारीका, अधिपरीचारीका, आरोग्य सेवक, सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेवक, सेविका, आशा कर्मचारी यांचा देखील यावेळी गौरव होणार आहे. यावर्षी लोकसंख्या नियंत्रणासाठी ’जोडप्यांनी जबाबदारी स्विकारा, कुटुंब नियोजनाचा अवलंब करा’ या घोषवाक्यावर प्रचार प्रसार करण्यात येणार आहे. लोकसंख्या दिनानिमित्त 11 ते 24 जुलै दरम्यान लोकसंख्या स्थिरता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअगोदर 27 जून ते 10 जुलै दरम्यान दांम्पत्य संपर्क पंधरवाडा राबविण्यात आला.