कुटूंबिय घरात झोपलेले असताना चोरट्यांनी मारला डल्ला

0

जळगाव । पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कालनीत सोमवारी मध्यरात्री कुटूंबिय घरात झापलेले असतांना चोरट्यांनी घरात घसून 53 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात दिवस घरफोड्यांच्या पाठोपाठ आता घरातले झोपलेले असताना चोरट्यांनी घरात घुसून चोरीचा धडका लावला आहे.

दरवाजा उघडा असल्याची चोरट्यांनी साधली संधी
हे. सेंट्रल बँक कॉलनीतील गट नं. 190/4 च्या प्लॉट क्रमांक 14 हा भगवान मराठे यांच्या मालकीचा आहे. त्यांच्या घरात वरच्या मजल्यावर रावसाहेब जयराम खोंडे हे भाड्याने राहतात. त्यांच्या सोबत वडील जयराम खोंडे, पत्नी कविता या राहतात. दोन दिवसांपुर्वी कविता यांच्या वहिनी सोनाली दीपक आहिरराव या आलेल्या होत्या. तापमान वाढलेले असल्याने रात्री झोपताना घराचा दरवाजा उघडाच ठेवतात. सोमवारी जयराम खोंडे यांनी कामासाठी बँकेतून 8 हजार रुपये काढून आणले होते. मंगळवारी ते एका जणाला द्यायचे होते. त्यामुळे ते त्यांनी पॅण्टच्या खिशात ठेवलेले होते. सोमवारी रात्री 12.30 वाजता खोंडे कुटुंबीय झोपले. पहाटे 5.30 वाजता नेहमीप्रमाणे कविता खोंडे या उठल्या. त्यांनी वेळ बघण्यासाठी खिडकीजवळ ठेवलेला मोबाइल शोधला. मात्र त्यांचा मोबाइल मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी लाईट लावून बघितला. तर मोबाइल, पर्स आणि जयराम यांची पॅण्ट गायब झाल्याची दिसून आली.

पाण्याच्या टाकीत मिळाली पर्स
रावसाहेब यांच्या पत्नी कविता यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पती आणि वहिनीला उठवून चोरी झाल्याचे सांगितले. घराची पाहणी केल्यानंतर चोरट्यांनी 13 हजार किमतीचे तीन मोबाइल, जयराम यांच्या पॅण्ट मधील 8 हजार रुपये, कविता यांच्या पर्स मधील अडीच हजार रुपये तसेच सोनाली अहिरराव यांच्या पर्समधील त्यांच्या मुलाचे 1 तोळे सोन्याचे आणि 5 भार चांदीचे दागिने असा एकूण 53 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. यातच चोरट्यांनी पर्स आणि पॅण्ट बाजुच्या घरावरील गच्चीवर असलेल्या पाण्याच्या दोन टाक्यांच्यामध्ये फेकलेल्या दिसल्या. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्ह दाखल करण्यात आला आहे.