जळगाव । घरात कुटूंबिय झोपले असतांना चोरट्यांनी गच्चीवरून घरात प्रवेश करत दोन महागडे मोबाईलसह 9 हजार 700 रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना शहरातील श्रीकृष्ण कॉलनी येथे घडली आहे. विशेष: म्हणजे घराच्या गच्चीवर चोरट्याचा मोबाईल मिळून आला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. दरम्यान, याप्रकरणी घरमालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्ण कॉलनी येथे योगेश नारायण व्यास हे कुटूंबियांसोबत राहतात. तर व्यास यांचे हॉटेलचा व्यावसाय असून कोर्टाजवळ त्यांची हॉटेल आहे. दरम्यान, बुधवारी हॉटेल बंद केल्यानंतर घरी आल्यावर रात्री नेहमीप्रमाणे जेवन झाल्यानंतर व्यास हे कुटूंबियांसोबत घरात झोपण्यासाठ गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या गच्चीवर चढत आत प्रवेश केला. घरात कुटूंबिय झोपले असतांना देखील चोरट्यांनी नऊ-नऊ हजारांचे दोन महागडे मोबाईल तसेच 9 हजार 700 रुपयांची रोकड चोरून नेली.
दोन मोबाईलसह 9 हजारांची रोकड लंपास
पहाटे व्यास यांच्या आई-वडीलांना जाग आल्यानंतर त्यांना त्यांचे मोबाईल व खुंटीला टागलेली बॅग दिसून आली नाही. त्यांनी लागलीच योगेश यांना उठवून मोबाईल व बॅग दिसत नसल्याचे सांगितले. यानंतर योगेश यांनी देखील त्यांचे व पत्नीचे मोबाईल शोधल्यानंतर दिसून आले नाही. यानंतर व्यास हे घराच्या गच्चीवर येवून पाहणी करत असतांना त्यांना पत्नी व आईचे मोबाईल तसेच पर्स मिळून आली. परंतू त्यांचा व वडीलांचा मोबाईल व पर्समधील 9 हजार 700 रुपयांची रोकड असा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. व्यास यांनी लागलीच जिल्हा पेठ पोलिसांना चोरीची खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. घराची पाहणी करत असतांना पोलिसांना गच्चीवर चोरट्याचा मोबाईल मिळून आला. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेत त्यावरून चोरट्याचा शोध घेत आहेत. यानंतर दुपारी योगेश व्यास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिगारेट चोरीप्रकरणी संशयिताला पोलिस कोठडी
जळगाव । शहरातील चोपडा मार्केटमधील सुरेश पुंडलिक पाटील यांच्या गोदामातून 50 लाखांच्या सिगारेटसह 2 लाखांची रोकड चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी मुख्य संशयित तेजस चंपालाल उनेजा (वय-33 रा. हॅपी कॉलनी, गोसावी वसाहत कोथरुड पुणे, मुळ रा.मालावाड जंक्शन जि.राजस्थान) अटक केली होती. त्याला पोलिस कोठडीचे अधिकार राखून संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज गुरूवारी त्याला न्यायाधीश के.एस.कुलकणी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयात कामकाज होवून संशयिताची 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक गजानन राठोड, नाना तायडे, रवि नरवाडे, शेखर पाटील, महेंद्र बागुल आदींचे पथक हे मुख्य संशयित तेजस उनेजा याचे साथीदार मुकेश मोहन चौधरी उर्फ राजु राठोड, चंपालाल चोगाराम वर्मा, सुरेंद्र अस्लारामजी चौधरी यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबई येथे रवाना झाले आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातच तेजस उनेजा हा न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याला गुरूवारी न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात येवून न्या. कुलकर्णी यांनी त्यास 10 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.