कुटूंब गच्चीवर झोपले अन् खाली घरातून 68 हजारांचा एैवज लंपास

0

मेहरुणमधील एकनाथ नगरातील घटना

जळगाव : जून महिन्याला सुरुवात होवूनही उकाडा कायम आहे. उकाड्यासमोर कुलरची हवेचाही उपयोग होत नसल्याने उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून नागरिक घराच्या गच्चीवर झोपत आहे. अशातच मेहरुणमध्ये एकनाथ नगरात गच्चीवर कुटूंब झोपल्याची संधी साधत चोरट्यांनी खाली घरातून बंद घराचे कुलुप तोडून 60 हजाराचे दागिने व 8 हजार रुपये रोख असा 68 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचा शुक्रवारी सकाळी उघड झाला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेहरुणमधील एकनाथ नगरात मीना पाटील या पती संजय भगवान पाटील, मुलगा दीपक व नितीन यांच्यासोबत महादू पाटील यांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहतात. घरमालक पाटील यांच्या कानाची शस्त्रक्रिया झाली असल्याने ते कुटुंबासह पुणे येथे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचे वरच्या मजल्याचे घर बंद होते. मालक नसल्याने मीना पाटील व कुटुंब 4 रोजी जेवण झाल्यानंतर रात्री गच्चीवर झोपायला गेले. दुसजया दिवशी सकाळी पाच वाजता मीनाबाई यांना जाग आल्याने त्या खाली आल्या असता मुख्य दरवाजाचे कुलुप तुटलेले होते तर दरवाजा उघडा होता. किचनचाही दरवाचा उघडा होता. किचनमध्ये भांडे अस्ताव्यस्त पडलेले होते तर त्या स्टीलच्या डब्यात ठेवलेले दागिने व रोख रक्कम गायब झालेली होती.

दागिण्यांसह रोकडवर डल्ला
40 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, 12 हजार रुपये किमतीचे 8 ग्रॅम वजनाचे कानातले सोन्याचे डूल, 5 हजार रुपये किमतीची 2 ग्रॅम वजनाची सोन्याची चीप, 3 हजार रुपये किमतीच्या 4 भार वजनाच्या चांदीच्या तोरड्या व 8 हजार रुपये रोख असा 68 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर मीना पाटील यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यावरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.