भुसावळ । मुक्ताईनगर शहरात कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याने विवाहितेचा सहा महिन्यांपुर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्याने त्यात हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुक्ताईनगरातील प्रसुती रोगतज्ज्ञ डॉ. विक्रांत जैस्वाल यांच्याविरुध्द विवाहितेच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता संजय वनारे (वय 28, रा. चिंचखेडा बु.॥, ता. मुक्ताईनगर) या विवाहितेवर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी मुक्ताईनगर येथील डॉ. विक्रांत जैस्वाल यांच्या कुसुमश्री नर्सिंग होममध्ये 3 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र शस्त्रक्रियेप्रसंगी डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याने विवाहितेचा मृत्यू झाला. तत्पूर्वी शस्त्रक्रियेनंतर विवाहितेला त्रास झाल्यानंतरही डॉक्टरांनी उपचार करण्यात दिरंगाई व टाळाटाळ केल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यावेळी नातेवाईकांनी केला होता. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली होती तर जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अभिप्राय मागितला होता. तो 26 जुलै रोजी पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी डॉ. जैस्वालविरुध्द गुन्हा दाखल झाला. मयत विवाहितेचा पती संजय रामदास वनारे (33, चिंचखेडा बु.॥) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.