कुठलेही काम करताना जबाबदारीने आणि निष्ठेने करा

0

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या आमदार स्मिताताई वाघ यांचे प्रतिपादन

जळगाव (निलेश झालटे) :– खरतर ३६५ दिवस महिलांचेच आहेत. आज कुठल्याही क्षेत्रात महिला कमी नाहीत. भारतासारख्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या राष्ट्रात पारंपारिकतेला जपत आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करत आहेत. सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक, विज्ञान तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे मत महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आमदार स्मिता वाघ यांनी केले. राजकारणात देखील अनेक ठिकाणी महिलांची आघाडी आहे. मी खान्देशातील आहे. खानेदशात देखील राजकीय क्षेत्रात महिलांचा फार मोठा सहभाग आहे. ग्रामपंचायत पासून ते खासदार स्तरापर्यंत खान्देशातील महिला राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत, असे स्मिता वाघ म्हणाल्या.

आमदार वाघ यांनी सांगितले की, राजकारणाची माझी सुरुवात विद्यार्थी परिषदेपासून वयाच्या 16 व्या वर्षांपासून झाली. त्यावेळी मी 11 वी ला होते. 1991 पासून मी भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहे. 2002 पासून जिल्हा परिषदेत निवडून गेले. यानंतर 2007 व 2014 ची टर्म देखील जनमताच्या जोरावर जिंकले. जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्ष असताना शिक्षण तसेच पाणीपुरवठा, आंगनवाडया आणि मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करू शकले. यामुळे जनतेशी थेट संबंध आल्याने चांगले अनुभव आले. या दरम्यान ग्रामीण भागाशी जोडले गेल्याचे समाधान अद्वितीय असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार वाघ म्हणाल्या कि, राजकारण आणि महिला म्हटलं की आपल्याकडे डोळे मोठे केले जातात. घरापासूनच विरोध सुरु होतो. मात्र मी या बाबतीत नशीबवान आहे. आमचे एकत्र कुटुंब होते. मला कुटुंबाचा पूर्ण सपोर्ट आहे. माझे पती जळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष उदय वाघ यांच्यासह माझ्या मुली, सासू सासरे, दीर, जाऊ हे सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यामुळे अजून पुढे झेप घ्यायला बळ मिळते. राजकारणात महिला म्हणून माझ्या आदर्श सुषमा स्वराज असल्याचे त्या म्हणाल्या.

महिला आणि पुरुष हा भेद मुळात चुकीचा आहे. महिलांनी सखोल अभ्यास करून व्यवस्थित नियोजन केल्यास त्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. कुठल्याही क्षेत्रात काम करताना जबाबदारीने आणि निष्ठेने केल्यास यश तुमच्या पायाजवळ लोळण घालेन हाच विश्वास या महिला दिनाच्या निमित्ताने मी व्यक्त करते. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा.

– आ. स्मिताताई वाघ
विधनपरिषद सदस्य,जळगाव