ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील अटेर येथे होत असलेल्या विधानसभा पोटनिवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी डमी इव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी (व्होट व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) ची चाचणी घेण्यात आली. या चाचणीतून मोठेच गौडबंगाल उघड झाले आहे. उत्तरप्रदेशसह पाच राज्यातील निवडणूकांनंतर व महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूकांनंतर देशभरात विरोधीपक्ष इव्हीएमवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत. हे आरोप होत असतानाच भाजपचे सरकार असलेल्या मध्यप्रदेशमध्ये इव्हीएमचे गौडबंगाल पत्रकारांसमोरच उघड झाल्याने खळबळ उडाली असून एकुणच निवडणूक आयोगाच्या कारभारावर संशय व्यक्त होऊ लागला आहे. या धक्कादायक प्रकारानंतरही येथील मुख्य निवडणूक अधिकारी सलीना म्हणाल्या, मध्य प्रदेशात इव्हीएम सोबत प्रथमच व्हीव्हीपीएटी मशिनचा प्रयोग होत आहे. मतदार मतदानानंतर 7 सेकंदांपर्यंत आपण केलेले मतदान पाहू शकतील. निवडणूक पारदर्शक होणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकार्यांसमोर घडला प्रकार
मध्यप्रदेशातील अटेर येथे विधानसभा पोटनिवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी सलीना सिंह यांनी डमी इव्हीएमवरील दोन वेगवेगळी बटणे दाबली तेव्हा दोन्ही बटनांवरुन व्हीव्हीपीएटीमध्ये कमळ चिन्हच छापले गेले. मात्र जेव्हा तिसरे बटन दाबले तेव्हा पंजा चिन्ह छापले गेले. दोन वेगवेगळी बटन दाबल्यानंतरही ’कमळ’ चिन्हच कसे छापले गेले, यावरुन विरोधकांनी निवडणूक पारदर्शक नसल्याचा आरोप केला आहे. मध्यप्रदेशातील या प्रकारामुळे विरोधकांनी हा मुद्दा आता उचलून धरला आहे.
अधिकार्याची पत्रकारांना धमकी
दोन वेगवेगळी बटने दाबल्यानंतर कमळाचे चिन्ह छापले गेले. हा प्रकार माध्यमांसमोरच घडला तेव्हा निवडणूक अधिकारी सलीना सिंह यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. हा प्रकार बाहेर जाऊ नये म्हणून सिंह यांनी बातमी छापली तर तुरुंगात पाठवेन, अशी धमकीच उपस्थित पत्रकारांना दिली.
भाजपचे षडयंत्र, विरोधकांचा आरोप
इव्हीएममध्ये गडबड असल्याचा हा प्रकार सर्वांसमक्षच उघड झाल्यानंतर लहार येथील आमदार डॉ. गोविंद सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचेच हे षडयंत्र असल्याचा आरोप केला. डॉ. गोविंद सिंह म्हणाले, ’इव्हीएममध्ये घोटाळा करुन भाजप विजयी होऊ इच्छित आहे. निवडणूक अधिकारी सलीना सिंह यांनी पत्रकारांना धमकावले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पारदर्शक कारभाराची आपेक्षा नाही.’
अहवाल मागवला
निवडणुकी आयोगाच्या अधिकार्याने या प्रकारबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही या प्रकारासंबंधीचा सविस्तर अहवाल जिल्हा निवडणूक अधिकार्यांकडे मागितला आहे. तो शनिवारी सायंकाळपर्यंत मिळू शकेल.