कुठल्याही पक्षाकडून पैसे घ्या पण मतदान ‘आप’लाच करा: केजरीवाल

0

नवी दिल्ली – पैसे कुणाकडून पण घ्या पण मतदान आप लाच करा असे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहाव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी केले आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मतदानासाठी अंतिम टप्प्यातील प्रचाराला वेग आलेला आहे. अंतिम टप्प्यासाठी अनेक राजकीय पक्षांची मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच केजरीवालांनी हे विधान केले आहे. देशाची राजधानी असलेली दिल्ली काबीज करण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्नशील आहे.

दक्षिण दिल्लीतील आप पक्षाचे उमेदवार राघव चड्डा यांच्या प्रचारावेळी अरविंद केजरीवाल यांनी हे वक्तव्य केले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपावर नाव न घेता टीका केली. मतदानाच्या एक दिवस आधी मतदारांना राजकीय पक्षांकडून प्रलोभने दिली जातात. आपल्यालाही कोणी अशी प्रलोभने देत असतील तर ती घ्यावी, कोणीही नकार देऊ नका मात्र तुमचं मत आपच्या उमेदवारांनाच द्यावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

दोन दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी प्रचारादरम्यान मोदींवर गंभीर आरोप केले होते. नोटाबंदी हा देशातील स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. जर व्यापाऱ्यांनी भाजपाला मतदान केलं तर सीलिंग सुरूच राहणार आहे. पण ‘आप’ला मतदान केल्यास सीलिंग थांबू शकतं, असंही केजरीवाल म्हणाले होते. मोदींनी राफेलमधून बक्कळ पैसा कमावला, त्याच पैशानं आता मोदी आमदार विकत घेत आहेत असा टोला केजरीवाल यांनी लगावला होता.