कुठे गेले भूमीका घेणारे साहित्यिक?

0

राज ठाकरे यांचा सवाल

सांगली : बेसावध असल्याने महाराष्ट्र 350 वर्षं पारतंत्र्यात होता, आज आपण पारतंत्र्यात आहोत ते फक्त बेसावध असल्यानेच. सध्या महाराष्ट्राची स्थिती बिघडली असताना कुठे गेले साहित्यिक? ते भूमिका का घेत नाहीत? का बोलत नाहीत? का लिहीत नाहीत? समाजाची मशागत करणे हे साहित्यिकांचे काम आहे. लोकांना वर्तमानातील घडामोडी समजावून सांगणे ही तुमची जबाबदारी आहे. ती तुम्ही पार पाडताना दिसत नाही. जर आजची वेळ निघून गेली तर पश्‍चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आतातरी बोला, लिहा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्यिकांना केले. ते रविवारी सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या औदुंबर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलत होते. कोरेगाव भीमा दंगलीचाही उल्लेख ठाकरे यांनी यावेळी केला. जातीपातीच्या भिंती पाडायला हव्यात. सध्या जाती-धर्माच्या नावाखाली मने दुभंगण्याचे काम सुरू आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

मराठीला अभिजात दर्जा कधी?
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत प्रत्येक टप्प्यावर साहित्यिक ठाम भूमिका घेताना दिसत होते. मात्र, हल्लीचे साहित्यिक राज्यात घडत असलेल्या घटनांविषयी भूमिकाच घेताना दिसत नाहीत. राज यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आणीबाणीचा काळ आणि केरळमधील साहित्य चळवळीचा दाखला देत राज्यातील साहित्यविश्‍वाला व्यक्त होण्याचे आवाहन केले. दक्षिणेतील तीन भाषांना अभिजात दर्जा मिळाला, पण मराठीला अजून भाषेचा अभिजात दर्जा मिळाला नाही. कदाचित गुजराती भाषेला हा दर्जा मिळू शकतो, ते पण अर्ज न करता, असे ते म्हणाले.

पंतप्रधान देशाचा असावा
राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. सध्या शहरांची स्थिती काय आहे? तुम्ही बेसावध आहात. मराठी भाषा टिकावी, पण त्या अगोदर मराठी माणूस टिकला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. मोदींच्या गुजरात प्रेमाविषयी ते म्हणाले, कमला मिलच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या गुजराती लोकांसाठी मोदींनी ट्विट केले, मात्र इतर ठिकाणी ज्या दुर्घटना घडल्या त्यावेळी ट्विट केले नाही. पंतप्रधान हा देशाचा असला पाहिजे. त्यांनी असा भेदभाव करता कामा नये. बुलेट ट्रेनसाठीही ते अहमदाबाद-मुंबई असाच मार्ग स्वीकारतात. दुसरे मार्ग नाहीत का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र सरकारचे पाठबळ नाही
फक्त एक दिवस साहित्यिकांचा सन्मान करायचा, पण त्यांचे साहित्य वाचणार नसू तर, मग संमेलन भरवून काय फायदा? औदुंबर येथील साहित्य संमेलनात आल्यावर आनंद झाला, कारण हे एकमेव भांडण न होता होणारे साहित्य संमेलन आहे. केरळमध्ये त्यांच्या भाषेसाठी कार्य सुरू आहे, त्याला केरळ सरकारपण पाठबळ देत आहे, पण महाराष्ट्र सरकारला मराठी भाषेशी काहीही घेणे-देणे नाही, असेही ठाकरे म्हणाले.