रत्नागिरी । कोकणातील कुणबी समाजाने दापोलीत राजकीय आस्तित्व निर्माण करण्याची शपथ नव्याने अधोरेखित केली. 2019 सालातील सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सज्ज व्हा, असे आवाहन मान्यवरांनी केल्याने आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकांत सामाजिक अस्मितेची मशाल पुन्हा एकदा पेटण्याचे संकेत आहेत. या मेळाव्यात कोकणातील पाचही जिल्ह्यातील कुणबी बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते. दापोलीतील जॉली क्लब मैदानावर कुणबी समाजोन्नती संघाच्या युवक मंडळातर्फे एकजूट, आरक्षण आणि राजकारणावर मेळावा आयोजित करण्यात आला होता.
राजकीय आस्तित्व सिद्ध करण्याची गरज
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री व शिवसेनानेते अनंत गीते, काँग्रेस नेते व नवी मुंबईचे उपमहापौर अविनाश लाड, राष्ट्रवादी नेते व दापोली पंचायत समिती सभापती चंद्रकांत बकर, शिवसेनेचे संदिप राजपुरे, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक गोविंद जोशी तसेच कुणबी मंडळाचे शरद भावे, माधव कांबळे, दिपक गोरीवले आदी उपस्थित होते. या मान्यवरांनी एकजूटीने संघर्ष करून राजकीय आस्तित्व सिद्ध करण्याची गरज व्यक्त केली.
नेतृत्वाने योग्य दिशा द्यावी
केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी मात्र राजकीय अस्तित्वाच्या मुद्द्यापेक्षा वैयक्तिक कर्तव्यांना महत्त्व दिले. मुठी आवळून प्रश्न सुटत नाहीत, मुठीमागच्या मनगटात ताकद यावी लागते. मुळात नेतृत्वाने योग्य दिशा द्यायला हवी. ध्येयापर्यंत पोचता आलें नाही, तर आंदोलने अपयशी ठरतात. अशी आंदोलने आणि अपयश समाजधुरीणांना अपेक्षित नसतात. सध्या आयुधाने संघर्ष करायची वेळ नाही. प्रत्येकाने फक्त स्वतची जबाबदारी योग्य रितीने पाळली, तरी विकासाची लढाई जिंकता येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.