लखनऊ । सुरक्षिततेच्या कारणामुळे संध्याकाळी सहानंतर महिलांना कार्यालयात थांबू नये असे आदेश लखनऊमधील डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून देण्यात आल्याने व याबाबत एका महिला कर्मचार्याने आक्षेप घेतल्याने आता या निर्णयाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर सुरक्षिततेच्या कारणामुळे संध्याकाळी सहानंतर महिलांना कार्यालयात थांबून द्यायचेच नव्हते तर विद्यापीठाच्या परिसरात एक कोटी रूपये खर्चून सीसीटीव्ही कशासाठी लावण्यात आले, असा सवाल या महिला कर्मचार्याने उपस्थित केला आहे.
दरम्यान, मांसाहारी पदार्थ बंद करण्याचा निर्णय दलितविरोधी असल्याचे सांगत विद्यापीठातील सुमारे 200 विद्यार्थ्यांनीही मंगळवारी मोर्चाही काढला होता. मांसाहारी पदार्थ मेसमध्ये तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर हा नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत मुभा
कुलगुरू आर. सी. सोबती यांनी दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठातील महिला अधिकारी आणि कर्मचार्यांना संध्याकाळी सहानंतर कार्यालयात थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत महिला कर्मचार्यांना कार्यालयात थांबावे लागणार असेलच, तर त्यासाठी त्यांनी विद्यापीठाकडून पूर्वपरवानगी घ्यावी, असे या आदेशात म्हटले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. सोबती यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे.
महिलांना कामाच्या ठिकाणी स्वातंत्र्य देणे म्हणजे हेच का? सुरक्षिततेच्या नावाखाली विद्यापीठाला महिला कर्मचार्यांना गप्प बसवायचे आहे का?, जर सुरक्षिततेच्या कारणामुळे संध्याकाळी सहानंतर महिलांना कार्यालयात थांबून द्यायचेच नव्हते तर विद्यापीठाच्या परिसरात एक कोटी रूपये खर्चून सीसीटीव्ही कशासाठी लावण्यात आले? विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय आम्हा अमान्य आहे.
– एक महिला कर्मचारी, डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनऊ