कुतुबमिनारचे दरवाजे आणि खिडक्या बदलण्यात येणार

0

नवी दिल्ली- कुतुबमिनार ही दिल्लीतील एक ऐतिहासिक वास्तू आहे. अनेक वर्षांपासून हा कुतुबमिनार भारताच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. मात्र याच कुतुबमिनारला आता धोका जाणवतो आहे तो पक्षी आणि वटवाघळांच्या विष्ठेचा. भारतीय पुरातत्त्व विभागाने पहिल्यांदाच या ऐतिहासिक वास्तूच्या खिडक्या आणि दरवाजे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत या खिडक्या आणि दरवाजे बदलले जाणार आहेत. मागील ५० वर्षांत पहिल्यांदाच हा बदल करण्यात येतो आहे.

दगडाची होत आहे झीज
पक्षी आणि वटवाघळे यांच्या विष्ठेमुळे कुतुबमिनारच्या दगडांची झीज होऊ लागली होती. तसेच दरवाजे आणि खिडक्याही मोडकळीला आल्या होत्या. पुरातत्त्व खात्याने झीज झालेल्या दगडांना विशिष्ट लेप लावला, तसेच ही प्रकिया सुरु केल्याच्या महिन्याभरानंतर दरवाजे खिडक्याही बदलण्यास सुरुवात केली. पक्षांची आणि वटवाघळांची घाण यामुळे कुतुबमिनारमध्ये दुर्गंधी पसरली होती. तसेच दगडाचेही नुकसान होत होते. यावर लेप देण्यात आल्यानंतर आम्ही दरवाजे आणि खिडक्या बदलण्यास सुरुवात केली आहे असे दिल्ली सर्कलचे पुरातत्त्व विभाग अधिकारी एन. के. पाठक यांनी म्हटले आहे.

सुविधेनुसार दरवाजे बदलले जाणार
कुतुबमिनारच्या प्रत्येक दिशेला दरवाजा आहे. यापैकी प्राचीन दरवाजे किती आहेत हे सांगता येणे कठीण आहे. मात्र आपल्या सुविधेनुसार हे दरवाजे बंद केले जातात. तसेच कुतुबमिनार येथे हवा खेळती रहावी यासाठी छोट्या खिडक्याही आहेत. १९५० मध्ये पुरातत्त्व खात्याने नवे दरवाजे लावले होते. त्यानंतर आता ते बदलले जात आहेत. आता जे दरवाजे लावण्यात येत आहेत ते फिक्स डोअर प्रकारात मोडतात. हे दरवाजे बहुतांश वेळा बंदच राहणार आहेत असेही समजते आहे. टाइम्सनाऊने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पक्षी आणि वटवाघळांच्या विष्ठेत आम्लारी घटक असतात ज्याचा परिणाम या पुरातन वास्तूच्या दगडांवर होताना दिसतो आहे. म्हणूनच या दगडांची झीज थांबावी यासाठी या दगडांवर विशिष्ट प्रकारचा लेप लावण्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरु होते. आता ते पूर्ण झाले असून येत्या काळात दरवाजे आणि खिडक्या बसवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.