जळगाव- कुत्रा आडवा आल्यामुळे रिक्षा उलटून चालक ज्ञानेश्वर रावजी मराठे (वय-३६) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता भालगावाजवळ घडली. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या मिठाराम गजानन मराठे (वय-६५, रा़ एरंडोल) या प्रवाश्यांचा जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असताना सकाळी ११ वाजता मृत्यू झाला़ एका महिला प्रवासी सुध्दा यात जखमी झाल्याचे समजते.
चालक ज्ञानेश्वर हा तीन प्रवासी घेऊन रिक्षातून (क्रमांक़ एमएच़१९़एक्स़९७५९) भालगावकडून एरंडोलकडे निघाला होता़ भालगावच्या काही अंतरावरच अचानक कुत्रा आडवा आल्यामुळे रिक्षा उलटली़ अन् रिक्षा उलटल्यामुळे चालक ज्ञानेश्वर याचा जागीच मृत्यू झाला़ अपघात झाल्याचे दिसताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली़ जखमींना त्वरीत रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले़ जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आलेले मिठाराम गजानन मराठे या प्रवाश्याचा मात्र, सकाळी ११ वाजता उपचार घेत असताना मृत्यू झाला़ यावेळी रूग्णालयात एकच गर्दी झालेली होती़ अपघातात रिक्षाचेही नुकसान झाले होते.