पाण्याच्या शोधार्थ हरिण शहरात आल्याचा संशय
भुसावळ :- मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवल्याने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली. जामनेर रोडवरील संतधाम, पंढरीनाथ नगरातील बुध्द विहाराच्या आवारात शुक्रवारी सकाळी बेकर जातीचे हरिणाचा मृतदेह आढळला. कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे या हरिणाचा मुत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. याबाबत वनविभागाने मृत हरिणाचा पंचनामा करून पुढील प्रक्रिया पूर्ण केली. याबाबत परीसरात चर्चा सुरू झाल्याने सेवानिवृत्त वनविभागाचे अधिकारी एस.पी.पाटील यांनी वनविभागाला माहिती दिली. यानुसार वनविभागाचे आरएफओ पी. टी. वराडे व पथक घटनास्थळी दाखल झाले.
बेकर जातीच्या हरणाचा पाडला कुत्र्यांनी फडशा
मृत हरिणाची पाहणी केल्यानंतर मोकाट कुत्र्यांनी या हरणावर हल्ला चढवल्याने तो मृत झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला. भुसावळ तालुक्यातील कुर्हे, वराडसीम, गोजोरा, वांजोळा आदी परिसरात नीलगायींसह हरिणाच्या टोळ्या आढळून येतात. यात बेकर जातीच्या हरिणांचे प्रमाण अधिक आहे. पाण्याच्या शोधासाठी कळपापासून लांब होऊन हे हरिण शहरातील पंढरीनाथ नगरात दाखल झाले असावे, याच वेळी मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवल्याने तो मृत झाला असावा, असा अंदाजही वर्तवला जात आहे. आरएफओ पी.टी.वराडे, राऊंड ऑफिसर भरत पवार, वनरक्षक वंदना कोळी, वनकर्मचारी विलास पाटील, नरेंद्र पाटील आदींनी पंचनामा करुन मृत हरिणाचा दफनविधी केला. यंदा भुसावळ तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. यामुळे वन्य प्राण्यांना भटकंती करुन शहराकडे यावे लागत असल्याचा प्रकार या घटनेतून समोर आला आहे.