चिखली : कुदळवाडीमध्ये टायरच्या गोदामाला गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमध्ये सुमारे 10 गोदामे जळून खाक झाली आहेत. टायर गोडाऊनच्या मागील बाजूस असलेल्या गवताला आग लागल्याने त्या आगीने उग्र रूप घेत कित्येक दुकाने या भीषण आगीमध्ये भस्मसात झाली.अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दुपारी दीड वाजता मिळाली. त्यानुसार तात्काळ संत तुकाराम नगर, रहाटणी, प्राधिकरण, भोसरी, एमआयडीसी विभागाचे 15 बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच खासगी टँकर देखील आग विझवण्यासाठी मागविण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, सकाळी 10 वाजता कुदळवाडीमध्ये गोडाऊनच्या मागील बाजूस पडलेल्या कचर्याला आणि सुकलेल्या गवताला आग लागली. याकडे स्थानिक नागरिकांनी दुर्लक्ष केले. दरम्यान ही आग पसरली. दुपारी बाराच्या सुमारास आग जवळच असलेल्या टायरच्या गोडाऊनमध्ये लागली. ही आग पसरत गेली आणि परिसरातील सुमारे 10 गोडाऊन आणि दुकाने जळून खाक झाली.