दिनेश यादव यांची मागणी
निगडी : कुदळवाडी पवारवस्तीमधील उड्डाणपुलाच्या रस्ता दुभाजकावर रिफ्लेक्टर बसवावेत अशी मागणी श्री महेशदादा युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी महापालिकेकडे केली आहे. या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुदळवाडी पवारवस्तीमधील उड्डाणपूल उतरताना रात्रीच्या वेळी या ठिकाणी असलेल्या रस्ता दुभाजकावर रिफ्लेक्टर्स नसल्यामुळे वाहनचालकांना दुभाजक दिसत नाही.
वारंवार होणार्या अपघातांमुळे या रस्त्यावर रिफ्लेक्टर्स, गतिरोधक व दुभाजक बसविण्याची मागणी वाहन चालकांबरोबरच नागरिक करू लागले आहेत. येथील रस्ता दुभाजकाची उंचीदेखील कमी असल्यामुळे त्यावर गाडी आदळून अनेक अपघात झाले आहेत. यातील काही अपघातांची पोलिस दप्तरी नोंदही नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागाने या ठिकाणी पालिकेने गतिरोधक व रिफ्लेक्टर बसवून दुभाजकांची उंची वाढवावी, या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.