नवापूर । आपल्या तालुक्यातील गावामध्ये आपल्या परसबागेत जे पिकत त्याचा वापर करून आपल्या बालकांना सुदृढ ठेवणे शक्य आहे. फक्त त्यासाठी या गोष्टीचा वापर कशा पद्धतीने करायचा या संबंधी जागृतीची गरज आहे. ही जागृती झाल्यास नवापूर तालुका संस्थागत प्रसुती आणि लसीकरणाप्रमाणे सुदृढ बालकांच्या बाबतीत सुद्धा पहिल्या क्रमांकावर येण्यावाचून राहणार नाही, असे प्रतिपादन नवापूर पंचायत समितीच्या सभापती सविता गावित यांनी केले. त्या तालुक्यातील गडद गावात भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे आरोग्य विभागाच्या सहकार्याने आयोजित विशेष प्रचार कार्यक्रमात बोलत होत्या.
आरोग्य विषयावर प्रचार कार्यक्रम
माता व बाल आरोग्य तसेच किशोरवयीन आरोग्य विषयावर या प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, नायब तहसीलदार अमर यादव, क्षेत्रीय प्रचार संचलनालयाचे अधिकारी पराग मादळे, पंचायत समिती उपसभापती दिलीप गावित, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजीय वळवी, सरपंच कुंदा वळणी, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक डी.बी.गावित, स्त्रीरोग तज्ञ डॉ.हर्षाली गावित, डॉ.कांचन वसावे, बालरोग तज्ञ डॉ.युवराज पराडके, डॉ.प्रदीप गावित, डॉ.कुंदन बेंद्रे इत्यादी उपस्थित होते. गटविकास अधिकारी वाळेकर यावेळी म्हणाले की, शासनातर्फे माता व बाल आरोग्यावर आधारीत अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा तळागळातील लोकांसमवेत समाजाच्या सर्व वर्गांनी फायदा करून घेतला पाहिजे.